_

_

Pages

Navigation Menu

असच आपल....



खर बघायला गेल तर हे डेज आणि काय ते वँलेंटाइन असल्या दिवसांच कौतुक कधी वाटलच नाही. याउलट ह्या आठ दहा दिवसात बाकी पुर्ण कॉलेजलाच आम्हा मेकँनिकलच्या मुलांची अडचण वाटत असावी. फ्रेंडशीप डे दिवशी हातात सुतळी बांधुन दिवस साजरी करणारी आमची ही येडी जत्रा ... कुणाला कुठही साधा काटा टोचला तरी दहा मिनिटाच्या आत हजर होणारी हीच ती येडी पोर ... कॉलेजच्या कोणत्याही कोपर्यात असली तरी कुणीही आवाज देताच हाथात जे सापडेल ते घेउन कॉलेजच्या चौकात हजर होणारी पण हीच पोर मग त्यासाठी ह्यांना कोणत्या फ्रेंडशीप बँडची गरज लागत नव्हतीच...
पण आता ह्या सो कॉल्ड प्रेमांच्या ह्या दिवसात आज हा दिवस उद्या तो दिवस असे मँसेज आले की खर तर कॉलेजचे ते दिवस आठवुन केलेले कीडे आजही नकळत हसवुन जातात हे ही तितकच खर.... रोज डे तर आपल्यासाठी रोजच...चॉकलेट तर ढिगान खात होतोच पण शेवटी राहिलेल्या चॉकलेटसाठीची मारामारी आजपण आठवतीयेच की, चॉकलेटस आता भरपुर आहेत पण ओढाओढी करायला कोण नसतय एवढच... प्रपोज डे म्हणजे नुसतीच बिनकामाची धावपळ, हीथ साध बोलल तरी गावभर बाजार उठवणारे कुणी चारचौघात अस डेरिंग कल असत तर खांद्यावर घेउन कॉलेजमधे त्याची मिरवणुक फिक्स....किस अन मीठी (मराठीत उग इंग्लिश डबल मीनिंग नको) डे म्हणजे स्वप्नवत दिवस चार वर्षाच्या कॉलेज दिवसात गणपतीत आरतीनंतर काय प्रसाद म्हणुन खोबर्याचा साखर टाकुन खीस भेटला असल तेवढाच....
कट्ट्यावर बसुन अगदी समोरच्यांनी रस्ते बदलुन जाण्याइतपत केलेल्या टवाळकीची मेकँनिकलच्या पोरांना शिक्षा द्यायची म्हनुनच बाकीचे डिपार्टमेंट हे नियोजन करत असावेत बहुदा !!! पण आमचे एक शिक्षक लई पॉजिटिवली म्हणायचे ही बाकी सगळी डिपार्टमेंट आपल्यासाठीच, सगळीकडे आपली सत्ता पाहिजे... कॉलेजात काय दंगा झाला की तात्पुरता बाकीच्या डिपार्टमेंटच्या शिक्षकांसमोर रागवनारे पण आमची पोर अस करणारच नाहित अस ठासुन सांगुन आमचीच बाजु घेणारे ते शिक्षक खरच कधीतरीचे मेक चे विद्यार्थी शोभायचे....
सगळ्यात आतुरतेन वाट बघितले जाणारे दोनच दिवस एक साडी डे अन् दुसरा ट्रँडीशनल डे... जेंव्हा सगळी गाणी वाजायची.... जाऊ डबल सीट न लांब पासुन ते हनिसिंगपर्यंत... कट्ट्यावर बसल्याबसल्या कास पठारावरची रंगीत फुल बघत फिरल्याचा फिल यायचा. तरीपण प्रत्येकजण आपल्या फुलाला शोधण्यात मग्न असायचा पण आपल्यापेक्षा आपले मित्रच आपल्याआधी तिला शोधायचे आणि एकच दंगा व्ह्यायचा... साडीत प्रत्येक 'ती' भारीच दिसते ... पण त्यांना मात्र जिन्सच का जवळची वाटते ते मात्र माहीत नाही. ... बाकी पोरं आपाआपल्या आवडी बरोबर फोटो काढुन घेणार आम्ही मात्र फक्त डोळ्यात साठवुन घेणार...नववारीतली तिची अदा, डोळ्यातल काजळ आणि केसातला गजरा काळजात घर करून जाणार तरीही आम्ही फक्त लांबुन कट्ट्यावरून फक्त डोळ्यातच साठवुन घेणार... कट्ट्यावर बसुन चिडवण डवचण जेवढ सोपं तेवढच अवघड समोर जाउन भिडन होत आणि भिडलो तरी अशा येड्या मित्रांच्यात राहुन टिकवण अवघड होत. पण हे सुद्धा चांगलच होत कुणाच्या तरी नजरेत चांगल दिसाव म्हणुन तात्पुरत खोट वागण आम्हाला मान्य नव्हत.
चार वर्ष झालीत पुर्ण कॉलेज संपुन तरीही सगळ्या आठवणी ह्या अशा काल परवाच्या वाटतायेत. अजुन पण कॉलेजच्या चौकातून, डिपार्टमेंटच्या बाहेरच्या कट्ट्यावरून, फर्स्ट इयरच्या बिल्डिंग समोरून, वर्कशॉपच्या टेरीसवरून आणि काँप्युटर आईटी इलेक्ट्रॉनिक्स मधुन आत्ता आत्ताच आल्यासारख वाटतय. माहीत नाही त्यावेळी आमच्यासमोरून फिरणारे सो कॉल्ड लैला मजनुच्या जोड्या किती एकत्र आहेत. मात्र कधीही प्रॉमिस न करता, चॉकलेटची अपेक्षा न ठेवता दिलेली मैत्रीची मिठी त्या टेडी प्रमाणे अगदी निस्वार्थीपणे आजपण निभावतायेत. खरच आम्ही मेकवाले तुमच्या नजरेत येडे असु पण माणुस म्हणुन नक्कीच जास्त शहाणे आहोत ....
#missing_धिंगाना
#we_mechanical
 #ARK
#dedicated_to_mechanicals

|| दिवाळी म्हणजे किल्ला आणि किल्ला म्हणजे शिवराय ||

                                || दिवाळी म्हणजे किल्ला आणि किल्ला म्हणजे शिवराय ||



दसरा होउन गेला की वेध लागायचे दिवाळीचे, नवरात्र सगळ सहामाही परीक्षेच्या आनिबाणीतच जायच. त्यावेळी हे दांडीया अन गरब्याच फँड नव्हत त्यामुळ आरतीलाच अगदी मंदीर भरून  गर्दी असायची. नवरात्र संपल तरी पेपर संपायचे नाहीत कोजागिरीपर्यंत पाठपुरवणी करायचे ... परीक्षा संपली की अगदी पिंजर्यातुन वाघ सुटावे अशा रुबाबात फिरायला मोकळे...किमान पंधरा दिवस का होइना पुस्तक वहीचा संबंध तुटायचा... दिवाळीचा अभ्यास नावाच एक प्रकरण असायच पण ते शाळा सुट्टीनंतर चालु होण्याआधी दोन तीन दिवसात उरकुन घ्यायच... जे शिक्षक असा अभ्यास देत नाहीत ते खरच खुप पुण्य कमवत असतील. शेवटचा पेपर चित्रकलेचा आणि मग सुट्टी ...
दिवाळीच आतुरतेन वाट बघण्याच प्रत्येकाच कारण वेगळ कुणाला गावाला जायच असायच, कुणी   फटाक्यांसाठी   कुणी नविन कपड्यांसाठी, तर कुणी फक्त करंजी चकलीसाठी (म्हणजे तेंव्हा तरी फक्त दिवाळीतच हे भेटायच ना !!! ) माझ दिवाळीची वाट पाहण्याच कारण वेगळच असायच.... "किल्ला"... महाराज भेटायचे... मावळे भेटायचे ... चार दिवसासाठी काय ते हिरोजी इंदळकर होण्याचा प्रयत्न ...पण तेंव्हा कुठ किल्ले पाहिलेले आमच्या मनानेच  मजले चढायचे , इतिहासाच्या पुस्तकांची मदत घेतली जायची पण त्यातली ती रेखाचित्र त्या वयात कुठ झेपायची... आधी चित्रांची मदत घेतली जायची पण लवकरच लक्षात यायच हे काय नाही जमणार मग पुन्हा पहिल्यापासुन सुरुवात.  चिखल कुठ कुठ लागायचा ह्याच भान फक्त कोणीतरी रागवल्यावरच यायच. दगड माती गोळा करताना जिवाचा आटापीटा व्हायचा, सायकल ह्यावेळी मैत्री निभवायची अगदी नदीतुन लाल माती ते रानातल्या काळ्या मातीपर्यंत.... घराच्या आजुबाजुचे दगड काही दिवसासाठी गायब होतात... अंगनात सगळा चिखल मातीचा  राडा व्हायचा , ह्या राड्यान आई कितीही रागवली तरी आज्जी आजोबा आपल्या पक्षात असल्यान आम्ही कायम सेफ असायचो ते दिवसच भारी होते.
दरवर्षी नवीन काहीतरी करायच आळीत आपलाच किल्ला द बेस्ट पाहिजे ही जिद्द असायची त्यासाठी मग काहीही करण्याची तयारी असायची. कधी किल्ल्यावर मधुनच नद्या वाहायच्या, तर कधी हत्तीच्या तोंडातुन कारंजे... सगळ्यात मोठ कष्ट पडायच ते दवाखान्यातुन सलाइनच्या पाइपा पळवतनाच, प्रेमाने मागुन कधी त्या मिळायच्या नाहीतच मग गनिमी कावाच उपयोगी यायचा. किल्ल्याच्या समोरच्या तळ्यात जिवंत मासे पाहिजेत म्हणुन नदीन केलेली तंगडतोड आजही स्पष्ट आठवतेय आणि त्यामुळ खाल्लेला मारही !!!!
सगळ्यात शेवटचा केलेला किल्ला नववीतला  अजुनही डोळ्यासमोर आहे. विशल्यान आणि मी केलेला... अरे लहान आहात का आता असले उद्योग करायला काय मातीत खेळताय  सगळ पद्धतशीर धुडकावत आम्ही गड जिंकलाच .  .. एका ठराविक  भागात डोळ्यांना दिसणार पाण्यान पुर्ण भरलेल खंदक... किल्ल्याला पुर्ण गोल विळखा घालुन बसल होत... निम्म किल्ल्याखालुन भुयारी आणि निम्म बाहेरून दिसायच ... कमानीच्या तटबंदीवरच्या हत्तीच्या सोडेंतुन त्यात पाणी पडायच आणि धक धक करत छोटी पणतीवाली बोट त्या खंदकातुन किल्ल्याच्या आतुन बाहेरून  गोल फिरायची  आजपण ती डोळ्यासमोर तशीच फिरतेय....
किल्ल्याच्या तटबंदीचा डौल काही निराळाच असायचा, आईने शिवुन दिलेला तो छोटासा भगवा अगदी अभिमानाने फडकायचा... कधी कपडे किंवा फटाक्यासाठी हट्ट धरलेला मला आठवतच नाहीये पण आवडलेला मावळा किंवा वाघ सिंह  घरी आनला नाही अस कधीच होऊ दिल नाही...
ती दुनियाच वेगळी होती ... प्रत्येकाला आपला किल्ला राजगडच वाटायचा (माझा आवडता किल्ला राजगड म्हणुन) !!! चार दिवस का होइना जो तो रायगडाच्या श्रीमंतीत जगायचा !! आणि प्रतापगडाच्या विजयात नाचायचा !!!!
प्रत्येकजण आपल्या किल्ल्याला रायगड, राजगड,प्रतापगडच नाव द्यायचा ... मग किल्ला  कसाही आणि  कोणताही असो आमच्यासाठी  आमचा राजा तीथ राहायचा ... काय वेड होत त्या नावत काय जादु होती माहीत नाही पण तय एवढ्याश्या वयात ही सगळी धावपळ व्ह्यायची ती त्याच मानसासाठी (देव नका बनवु हो त्या पराक्रमी माणसाला ... पुन्हा देव्हार्यात ठेवलेल आमच राजं आम्हाला किल्ल्यांवर  कधी भेटनारच नाहीत... मुजरा करण्यात जो अभिमान आहे तो तुमच्या देव्हार्यातल्या देवापुढ नवस बोलण्यात नाही )...
पहिल्या अंघोळी दिवशी महाराजांच पाय गडाला लागायच... सगळ्यात उंच बनवलेल्या भागात महाराज सिंहासनाधिश्वर व्ह्यायच आणि आठ दिवसाच्या आमच्या कष्टाच सोनं व्हायच ......




                           || दिवाळी म्हणजे किल्ला आणि किल्ला म्हणजे  शिवराय ||

एक वादकाच्या नजरेतुन....


का वाजवता ??? काय मिळत तुम्हाला ढोलताशे वाजवुन ??? अगदीच शुद्ध शिकलेले अशिक्षित असतील तर ते म्हणतील फुकटच ध्वनीप्रदुषण..तर काहीजण अगदी पुढचा मागचा विचार न करता हुल्लडबाजीचा ठपका लाऊन मोकळे... असो बाप्पा येणार म्हणल की मग तुम्ही काहीही अगदी कसही बोला आम्हाला ते ऐकु येतच नाही. आमच्या डोक्यात एकच झिंग असते ती म्हणजे ताशावर मनमुराद बरसनार्या काडीची, ढोलाच्या पानावर अगदी पुर्णपणे ताकदीने तरंग उठवनार्या टिपराची अन आकाशाशी स्पर्धा करणार्या त्या भगव्याची... पण खुप जणांसाठीचा प्रश्न काय मिळत ??? आता काय मिळत ते शब्दात कस सांगणार आणि ते सांगुन कस समजणार ? ढोल ताशा शब्दात मांडण्याचा विषय नव्हेच हा जगण्याचा विषय बघा तुम्ही पण जगुन कधीतरी मिळतील तुम्हालाही तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे .... कारण आम्ही वाजवतो फक्त आमच्या बाप्पासाठी , आम्ही वाजवतो आमची मर्हाटमोळी परंपरा जपण्यासाठी, आम्ही वाजवतो आमच्या बाप्पाला हक्काने नाचवण्यासाठी अन् ढोल ताशाची संस्कृती जगाच्या कानाकोपर्यापर्यंत पोहचवन्यासाठी ...

बाप्पाला निरोप दिल्यावर घरात ठेवलेल टिपरू अगदी दिसेल तेंव्हा अगदी आठवण होईल तेंव्हा हातात घेउन फिरवून बघनारच, पुढच्या वर्षी नवीन काय करता येईल हा विचार कायम वर्षभर चालुच असणार. हेडफोन मधे कोणतही गाण लागो आपसुक तुमचे हाथ टेबलाला ढोल समजुन ठेका धरणारच अन् त्यातुनही मोरया मोरया, माउली माउली नाहीतर पहील नमन लागल की मग पर्वणीच आवाज वाढणार अन तुम्ही शेजारच्याच्या हमखास शिव्या खाणार ... अगदी रस्त्याने एकटेच चालला असाल तर भजनीचा मांडीवर थापीन कधी वादन चालु कराल ते तुम्हालाही समजत नसेलच... खुप विचार न करता सगळ्या आठवणी आल्याच ना कारण आपल्यातला वादक वर्षभर वादकच असतो. अनंत चतुर्दशीच्या दुसर्याच दिवशी 354 days to go...असा फेसबुकवर स्टेटस टाकणार आमच लहान मुलाच मन तेवढ्याच आतुरतेन बाप्पाची वाट बघत असतो एवढ मात्रखर...... बाप्पा येतायेत.....
#
वादकोत्सव_२०१५


दोन महीने आधीपासुन चालु होणारी लगबग अगदी दोर्या ताणन्यापासुन ते टिपरू बनवुन घेण्यापर्यंत ... नखात जाउन बसणार गोन आणि ढोल तानताना दोरीबरोबर जाणारी हाताची कात, कमरेभोवती दोरीचे वळ, तळहातावर आलेले फोड, शरीराचा एकनएक दुखणारा भाग एक आपसुकच आतल्याआत आनंद देत असतो कारण बाप्पासोबत असतो. लहानपणी शाळा सुटून कधी घरी पोहचतोय अस वाटणार ते ''फिलींग" फक्त आणि फक्त ह्याच दिवसात पथकाच्या ओढीन मिळत. वेळेप्रसंगी कॉलेजला दांडी मारून ऑफिसात बॉसला कल्टी मारून जो तो हजर.... जसजस बाप्पा जवळ जवळ येतील तसतस ऑफीशियली आजारी पडण्याच प्रमाणही वाढत जात. दिड दोन महिन्याच्या कसुन केलेल्या सरावानंतर ओढ असते ती बाप्पाच्या समोरच्या पहिल्या वादनाची. पहिल्यांदाच वादन करणारे अगदी पूर्ण अभ्यास करून सुद्धा पेपरच्या आधी जशी मनस्थिती असावी तश्या अवस्थेत तर जुने वादक मात्र मागच्यावर्षी वातावरण कस भारी होत हे अगदी रंगवुन सांगण्यात मग्न असतो. आणि आपसुकच मित्रमंडळीतुन प्रश्न सुरु होतात मग तुम्ही यंदा कुठ ?? तुम्ही कुठ वादन करणार ?? आम्ही ह्या मानाच्या  गणपतीला तुम्ही कुठ ??? ते लक्ष्मी रोडला असतात तुम्ही कुठ ?? पण प्रत्येक वादकासाठी सगळ एकासाठीच चाललेल असत ते म्हणजे त्या बाप्पासाठी..सगळे कष्ट सगळी मेहनत त्या बाप्पासाठी मग कोणता मोठा अन कोणता छोटा हे ठरवणारे आपण कोण ?? लक्ष्मीरोडच च म्हणाल तर तीथ वादनाची नशा वेगळीच पण आमच्यासाठी आम्ही कुठही वादन करो लक्ष्मीरोड एवढ्याच आत्मियतेन करतो एवढ मात्र खर .....
हे दिड दोन महीने आम्ही आमच्याच दुनियेत जगत असतो. मित्र भेटले की ''अरे जिवंत आहेस का ??" टोमना ठरलेला पण खरतर ह्याच दिवसात आम्ही जगतो हो ... अगदी मनसोक्त मनाला वाटल तस अगदी राजेशाही थाटात... बाप्पा समोरच्या वादनाची पहिली वेळ असो वा शंभरावी उत्सुकता तेवढीच ... पहिल्या दिवशी ताशाच्या तर्रीनंतर ढोलावर पडणारा पहीला ठोका ते अलका चौकातला शेवटचा फक्त आणि फक्त बाप्पासाठीच ....दोन महिन्याच्या मेहनतीला सोनेरी झालर लागते ती ह्याच दहा दिवसात. पहिल्या दिवशी ढोल ताणण्यापासुन अनेक नवनवीन मित्र जोडले जातात काही कामापुरतेच पण काही मात्र जिवाचे जिवलग होतात. दहा दिवसातला एक एक क्षण सोनेरी बनवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न.
बाप्पाच्या सहवासात दहा दिवस कसे जातात समजत नाही आणि उजाडतो अनंत चतुरदशीचा, ह्या दिवशीची मनाची अवस्था वेगळीच असते वादनाला प्रत्येकजण तयार प्रत्येकाला आपला बेस्ट द्यायचा असतो, बाप्पाला खुप नाचवायच असत पण मनात एक गोष्ट बोचत असते बाप्पाला निरोप द्यायचा असतो. त्याला खुप नाचवायच असत पण घालवायच नसत. लक्ष्मी रोडवर पाउल जड होतात जेवढा जास्त वेळ मिळेल तेवढा वेळ घ्यायचा असतो. शगुन चौकात धिंगाना घालुन पुढ निघतो आणि जाणवु लागत वेळ कमी कमी होत असतो अलका चौक जवळ येत असतो, लक्ष्मी रोडवरच वादन प्रत्येक वादकाची स्वप्न पण हे पूर्ण करताना बाप्पाला निरोप द्यायची वेळ जवळ आलेली असते.... अलका चौक जसजसा जवळ येइल तस पुर्ण ताकतीन पडणार टिपरू तुला डोळ्यात साठवुन घेताना डोळ्यात जमा होणार पाणी बाप्पा तुझ नि माझ नात सांगुन जात... वर्षभर पुरेल एवढा आनंद देऊन जाताना मात्र कायम रडवुन जातोस... बघ पुढच्या वर्षी लवकर ये आणि जमल तर जरा मोठी सुट्टी घेउन ये....
#
बाप्पा_लवकर_या
#
रुद्रगर्जना_२०१५
तात्पुरता थांबतोय हा प्रवास तर असाच चालु राहील.....
#
गणपती_बाप्पा_मोरया
#
लवकर_या


वारी..... एक जगण्याचा विषय

विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥१॥
विठ्ठल अवघ्या भांडवला । विठ्ठल बोला विठ्ठल ॥ध्रु.॥
विठ्ठल नाद विठ्ठल भेद । विठ्ठल छंद विठ्ठल ॥२॥
विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा । तुकया मुखा विठ्ठल ॥३॥

विठ्ठल विठ्ठल ..... ज्ञानेश्वर माउली.... अन तुकोबारायांच्या जयघोषात देहभान विसरून  जिवाला लागलेली असते आस त्या पांडुरंगाला भेटण्याची ..वारी.... .. ही परंपरा महाराष्ट्राची,अस्मिता महाराष्ट्राची ... देहुतुन तुकोबाराय आणि आळंदीतुन ज्ञानेश्वर माउलींना सोबत घेउन  निघालेला वैष्णवांचा मेळा आषाढी एकादशीला विठुरायाच दर्शन घ्यायला पोहचतो. घरदार संसार विसरून  प्रत्येक वारकरी वारी जगतो. खर तर वारी हां लिहण्याचा किंवा वाचण्याचा विषय असु शकतो अस मला तरी अजिबात नाही वाटत वारी ही प्रत्येकाने अनुभवावी प्रत्येकाने    जगावी..... वारी हा जगण्याचा विषय तो प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी जगावीच...  वारीची पुण्याच्या मुक्कामात आणि दिवे घाटात टिपलेली काही क्षणचित्रे ...























चालला गजर जाहलो अधिर लागली नजर कळसाला
पंचप्राण हे तल्लीन आता पाहीन पांडुरंगाला
देखिला कळस डोईला तुळस धावितो चंद्रभागेसी
समिप ही दिसे पंढरी याच मंदिरी माऊली माझी
मुख दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा त्राता
घे कुशीत गा माऊली तुझ्या पायरी ठेवतो माथा

माऊली माऊली, माऊली माऊली
माऊली माऊली, माऊली माऊली

पुंडलिक वरदे हारि विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय

सोहळा सार्वभौमत्वाचा.... सोहळा शिवराज्याभिषेकाचा....


एकच धुन सहा जुन !!!! आमच धनी छत्रपती होणार ...गुलामगिरीच्या अखंड विळख्यातुन धरणीला मुक्त करत भूपती होणार... पित्याच्या मायेने जनतेला संभाळलेले आमचे धनी खर्या अर्थाने प्रजापती होउन गरीब भोळ्याभाबड्या जनतेवर मायेच छत्र धरणारं आमच राजं सिंहासनाधिश्वर होणार ...स्वराजाच्या रोहिडेश्वराच्या समोर घेतलेली शपथ पूर्ण करत स्वराज्य निर्मित अखंड हिंदुस्तानात सत्ता गाजवनार्या उन्मत्त सत्तेला नेस्तानाबुत करत श्रींच राज्य पुर्नत्वास येणार आणि आमच राजं सिंहासनाधिश्वर होणार ... तानाजी येसाजी बाजीच स्वप्न पूर्ण होणार... लहानपणी मांडलेला गडकोटांचा  खेळ पूर्ण होणार  आमच राज सिंहासनाधिश्वर होणार... आऊ साहेबांनी बघितलेल स्वराज्याच स्वप्न पूर्ण होणार ... शहाजी राजंचा मुद्रा भद्राय राजते चा आशीर्वाद खरा होणार आमच राजं सिंहासनाधिश्वर  होणार .....
गड कोटांनो, तटा बुरुजांनो  या  .... हिमालया ये सह्याद्री जवळ येउन तिचा आनंद बघ ये...सप्तनद्यानो या ..... साता समुद्रानो ..... या अवघे अवघे या.... आमच राजं सिंहासनाधिश्वर  होणार ....


ठरल... नगारखान्यासमोर नंग्या तलवारी नाचवायच्या.... ढोल ताशाच्या तालावर बेधुंद होउन नाचायच ... गड भगवा झालेला बघायचा.... भान राखुन बेभान व्हायच खुप दिवसापासुनच स्वप्न ... राज्याभिषेक याची देही याची डोळा  बघायचा म्हणजे भाग्याच...रायगडा च्या उत्सुकतेन रात्री न लागलेली झोप ... पहाटे चारलाच बाहेर पडलो आणि चार पाच किलोमीटरवर पावसान गाठल, थांबुन पाउस थांबण्याची वाट बघत बसलो.
पाउस काय थांबेना आणि मला काय धीर धरवेना मग भर पावसात आमची स्वारी निघाली रायगडाकड. रायगडाकड जायची म्हणजे एक वेगळीच ओढ असते. तम्हिनीतुन जाताना दिसणार अप्रतिम सह्याद्रीच सौंदर्य डोळ्यांत साठवत चाललो. वाहणारे ढग सह्याद्रीला कवेत घेत होते अधुन मधुन पावसाच्या सरी चिंब भिजवत होत्या. निसर्गपण जणु राज्याभिषेकाच्या आनंदात सहभागी होत होता. निजामपुर ते पाचाडच्या रस्त्यावरून जाताना भन्नाट सह्याद्रीच दर्शन पुन्हा पुन्हा तिच्या प्रेमात पाडत होत.अचानक गाडी चालवताना अगदी चार पाच फुट अंतरावरून   डाव्याबाजूने एक घार जोरात उजव्या बाजुच्या खोल दरीत उडाली, तो नजारा बघण्यासारखा होता. चार पाच सेकंदांचा घोळ झाला आणि आमची गळाभेट होता होता राहीली.
जसजसा रायगडजवळ येईल तसा आतुन येणारा आनंद वेगळाच होता. पाचाड जवळ आल तशी गर्दी जाणवु लागली. डोक्यात एकच विचार घुमत होता काय वातावरण  असेल हो ह्याच राज्याभिषेकाच्या आधल्या दिवशी ह्या इथ ??? रोहिडेश्वराच्या  समोर शपथ घेणारे शिवबाराजे उद्या सिंहासनाधिश्वर होणार होते. तोरन्याच तोरण बांधुन सुरु झालेल स्वराज्य रायगडावरयेइपर्यंत एक साम्राज्य झाल होत. प्रत्येकाच जीव की प्राण झाल होत. स्वराज्याच्या ह्या अग्निकुंडात अनेकांच्या प्राणांची  आहुती दिली होती. सगळ्यांच एकच सोनेरी स्वप्न होत स्वराज्य आणि त्याचच फळ स्वरुप रायगडावर बत्तीस मन सोन्याच सिंहासन साजर  झाल होत.  पाचाडात आऊसाहेबांना  मुजरा करून  रायगडा कड  मोर्चा वळवला. देशमुखांच्या खानावळीत पोटाची  आग विजवुन. रज्जु रथाजवळ जिवलगांची आणि आमचा नंबर येण्याची वाट बघत बसलो. दोन दिवसासाठी ताकद वाचवून ठेवायची होती.
हिरकणी बुरुजावरून   सरळ   राजसदरेत धन्याला मुजरा  करायला... गड गजबजला होता सदरेपासुन होळीच्या माळावरुन जगदीश्वरापर्यंत जिकडेतिकडे गर्दीच गर्दी खरच राजधानी भासत होता आज रायगड. बाजारपेठ गजबजली होती. पूर्ण गडावर धन्याचा जयघोष... गड भगवा झालेला... जगदीश्वराच आणि महाराजांच  दर्शन घेउन कोल्हापुरकरांचा पाहुनचार घेण्यासाठी जिल्हा परिषदेची इमारत घाठली ... शिवशक्ति प्रतिष्ठान च्या मावळयांना खरच त्यांच्या कामासाठी मनापासुन मुजरा घालावासा वाटला अन्नछ त्रा ची जबाबदारी अगदी मनापासुन संभाळलेली.... ऐकत नाय मंडळासोबत  खिचडी आणि आमटी भातावर येथेच्छ ताव मारला... ह्या जेवणासमोर फ़ाइव स्टार भी झक मारतीय की हो... एक पत्रावळी आणि किती हाथ काय मोजले नाहीत....

सायंकाळी चार पाच च्या सुमारास छत्रपती संभाजी महाराजांच  ढोल ताशा आणि तुतारींच्या गजरात झालेल आगमन... डोळ्याच पारण फेडणारा तो क्षण.... किल्ल्यावर त्या दिवशी असणारी लाईट व्यवस्था अप्रतिम होती ... विजयी मनोरे प्रकाश झोतात न्हाहुन निघत होते. महाराजांच्या राज्याभिषेकावेळी काय सजला असेल रायगड याची कल्पना करत होळीच्या माळावर वेडयागत फिरत बसुन घालवलेला तो वेळ.... गड राबता ठेवा हे महाराजांचे शब्द जागेपणी स्वप्नात बघत होतो. गडावर मुंगीसारखी माणस .... अंगावरची बदललेली कापडं सोडली तरी हाथातल्या तलवारी ... प्रत्येकाच्या चेहरया वरचा ओसंडून वाहणारा आनंद ... प्रत्येकाची आपापल्या परीन चालेलेली घाई... पूर्ण गडावर घुमणारा महाराजांचा  जयघोष .. ...  वर भरून  आलेल  आभाळ  ...  होळीच्या माळावरून  बघितल्यावर राजसदरेवर वाहणारे रंगीत ढग (लाईटमुळ झालेले नाहीतर स्वप्नात जगता हां आमच्यावरचा ठपकाच).... बाजारपेठ भरून  वाहत  होती....  येणारे येतच होते.... गर्दी वाढतच होती.... काय जादु आहे ह्या नावाची ??? माणुस मेल्यावर १२ दिवस जुलमान आठवण ठेवणारी हीच माणसाची जात आज साडे तीनशे वर्षानसुद्धा एका नावावर जगतात.... एका नावाखाली जमतात... जमलेल्या प्रतेकाच्या डोक्यात एकच शब्द घुमत असणार .... शिवराय शिवराय आणि फक्त शिवराय ...

वार्यावर फडफडणारे भगवे आजही माझ्या राजाची महती सांगतायेत...दरबारात चाललेली शाहिरी आणि पोवाडे... अंगाला बोचणारी पण हवीहवीशी वाटणारी थंडी... बाजारपेठेत निरभ्र आभाळाखाली पिठल भाकरीवर मारलेला ताव...चांदण्यात एका बाजुला जगाचा ईश्वर आणि दुसर्या बाजुला आमचा परमेश्वर...झोपेसाठी जागेची मारामारी आणि पायरीवर झोपुन काढलेली आर्धी रात्र... आणि सोन्याचा दिवस उजाडला.


नगारखान्यात नगाडा घुमला, फडकला भगवा गगनावरी,
बाहु पावले स्पुरण , जयघोष छत्रपतींचा तळपल्या नंग्या समशेरी .

 ढोल ताशाच्या गजरात.... मोठ्या उत्साहात... चककनारी तलवारीची पाती.... सासनकाठ्या भंडारा.... भगवा गड.... शाही मिरवणुका... महाराजांचा सुवर्णमुद्रानी केलेला अभिषेक ...धनी सिंहासनाधिश्वर झाल .... सोहळा याची देही याची डोळा..... आम्ही भाग्यवंत .... अपुरे शब्द ....