पुरंदर स्वच्छता मोहिम आणि दुर्गभ्रमंती
इतिहास मराठी मातीचा परिवार !!!
दि. १८ जानेवारी २०१५
दि. १८ जानेवारी २०१५
पहाटे तीन वाजता फोन वाजतोय ....कोण आहे एवढ्या लवकर ??? पहाटे तीन वाजता ते पण रविवारची पहाट .... फोन उचलला तर पलीकडून किशाचा प्रश्न झोपलाय का ???? अरे ##@@## .... आमच्याकड तरी ह्या वेळेला झोपतातच. आम्ही वाकड ला आलोय सहा वाजेपर्यंत पुरंदर पायथ्याला पोहचतोय सांगुन किशान फोन ठेवला. अहो पण हे तर रात्रीच ठरलेल ना. तरी मुंबईकरांची ही अश्या खोड्या करायची जुनी सवई . मुंबईकर निक्या किशा रुप्या तिघ पण अवलियेच. कॉलेजला असताना सातारकर म्हणुन झालेली मैत्री आणि आता जिवलग मित्रांच्या यादीमधले ! झोपेच खोबर झालच होत पण ह्याच विशेष वाईट वाटल नाही कारण जवळ जवळ दोन अडीच वर्षानंतर आम्ही सगळे भेटणार होतो. मुंबईकरांसोबत अजुन बम्पर गिफ्ट होती.सचिन दरेकर पु.क.फेम सचिन दरेकर. आणि सोबत होता पूर्ण इतिहास मराठी मातीचा परिवार !!! निमित्त होत पुरंदर स्वच्छता मोहिम आणि दुर्गभ्रमंती !!
सहालाच कायमची माझी पार्टनर घेउन अंधारातच बाहेर पडलो. रोड लँपच्या उजेडात सोनेरी झालेल धुक कापत मी आणि ती निघालो होतो. (बाईक हो ...अजुन ती वाली ती नाहीयेय !!) दापोडी स्टेशन वरून मह्याला ला घ्यायच होत. मी पोहचायच्या आधीच मह्या हजर होता. कॉलेजच्या वेळी एकदा माझी आणि ऋशीची वाट बघत NH4 च्या डिवायडरवर हायवेच्या बरोबर मधोमध उभा राहिलेला आज रस्त्याच्या बाजुला उभा राहिलेला महेश (मह्या) खरच आय टी मधला प्रोफेशनल अभियंता वाटत होता. तिथुन दोघेजण हाय फाय सिमेंटच्या जंगलात घुसलो. तळ्यात मळ्यात करत ती धावत होती. मागुन मह्याच बोलण चालु होत.आणि ह्या जंगलात आमचा रस्ता चुकला. पाउलवाटा कधी चुकत नाहीत पण हे डांबरी रस्ते हमखास चुकवतात. विचरत विचरत पाबे घाट गाठला. घाटात हौश्यांची गर्दी होतीच.एका बाजुला पूर्ण पुणेआणि दुसरीकड भास्कररावांच दर्शन घेत दिवे घाट ओलंडला.
घाटा पलिकडे माउलींच्या विसाव्याजवळ मस्त गरमागरम कांदा भजी खाऊन पुढ निघालो. जाधवगडाकड बघत पुढ निघालो आत्ताच होटेल जाधवगड. सासवड भागात चकरा वाढल्यात एवढ मात्र खर.सासवडमधे शिरताच समोर असणारी महाराजांची मूर्ती कायमच मनाला भुरळ पाडते. दिड दोन महिन्यात ही तीसरी चौथी वेळ होती.
सासवड ला वळसा घालुन आम्ही पुरंदरकड धाऊ लागलो. समोर दिसत होता पुरंदर आणि वज्रगड. गडाचे अवाढव्य रूप पाहून डोक्यात शहाजी महाराजांचे शब्द खेळत होते.
"गडासारखा गड पुरंदर दरडीवरती दरड
कड्यावरती कडे त्याच्या वरती कपार
कपारीला धार धारेवरती कोट
कपारीला धार धारेवरती कोट
कोटाच्या आतमाची माचीच्या आत बालेकिल्ला
बालेकिल्ल्याला बुरुज चोवीस चोवीस बुरुजात शेंद्र्या बुरुज
बुरुज भिडला आहे आभाळाला आभाळात भिरभीरतील घारी
अन् बालेकिल्ल्यात तळपतील तिखट तलवारी "
बाकी मंडळी पायथ्यापासुन चालत वर गेले होते. आम्ही मात्र गाडीवरच वरपर्यंत गेलो. आणि समोर लागल इंट्री गेट हो इंट्री गेट च पुरंदर आता भारतीय लष्कराच्या अदिपत्याखाली आहे. मुंबईकर भेटले. गेट वर फॉरमलिटीज त्यांनी आधीच पूर्ण केल्या होत्या.विजिटर डायरीत ४१+२ करून आम्ही आत घुसलो.
कॉलेजला असताना रात्र रात्रभर इतिहासावर चर्चा व्हायची आपली पण अस काम करणारी संस्था असावी अस वाटायच पण त्यावेळी ते हवेतच विरून जायच. पण मुंबई करानी ते काम मात्र पूर्ण केलय. आज इतिहास मराठी मातीचा परिवार विविध क्षेत्रात कार्यरत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन आज पुरंदर वर स्वच्छता मोहिम होती. कॉलेज मधे टिंगल्या उडवनारा निख्या आज प्रत्येक किल्ल्याची पावला पावलाची माहिती ठेवतो. उगच गूगल बाबा म्हणुन नाही ओळखत त्याला.
पुरंदर ... पुरंदर बद्दल मनात जरा वेगळच स्थान. स्वराज्याच्या धाकल्या धन्याच, दिल्लीच्या तख्ताला महाराष्ट्रापुढे लोळण्या घ्यायला लावनारया रणधुरंधर छत्रपती संभाजी महाराजांच जन्मस्थान. मुरारबाजींच्या अतुलनीय पराक्रमाचा साक्षीदार पुरंदर. पुरंदराचा उल्लेख पुराणात इंद्रनील पर्वत म्हणुन आढळतो. इंद्राच स्थान जस बळकट तसच पुरंदराच. बहामनी, आदिलशाही, मराठा राजवट, मुघलशाही , पेशवाई , ब्रिटिश राजवट आणि आत्ता भारतीय लष्कर असा भल्या मोठ्या इतिहासाचा साक्षीदार.शिवरायांच्या स्वराज्य उभारणीच्या सुरुवातीच्या काळापासुन ते अगदी इंग्रजांविरुद्ध लढणार्या उमाजी नाईकांनपर्यंत पुरंदर ने सगळ्याना साथ दिलीय. स्वराज्याच्या सुरवातीच्या काळात ह्याच पुरंदर न मोलाची साथ दिलेली. फत्तेखानचा बंदोबस्त ह्याच्याच आधारान केलेला. १४ मे १६५७ रोजी इथच शंभु राजांचा जन्म झाला.मुरारबाजींनी सईबाई महाराणीसाहेबांच माहेरपण केल.
शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदराला वेढा घातला. या युद्धाचे वर्णन सभासद बखरीमध्ये असे आढळते.
'तेव्हा पूरंधरावरी नामजाद लोकांचा सरदार राजियाचा मुरारबाजी परभू म्हणून होता. त्याजबरोबर हजार माणूस होते. याखेरीज किल्ल्याचे एक हजारे असे दोन हजारे लोक होते. त्यात निवड करून मुरारबाजी याने सातशे माणूस घेऊन ते गडाखाली दिलेरखानावरी आले. दिलेरखान तालेदार जोरावर पठान पाच हजार याखेरीज बैईल वगैरे लोक ऐशी गडास चौतरफा चढत होती. त्यात होऊन सरमिसळ जाहले. मोठे धूरंधर युद्ध जहले. मावळे लोकांनी व खासां मुरारबाजी यानी निदान करून भांडण केले. पाचशे पठाण लष्कर ठार जाहले. तसेच बहिले मारले.'
'अरे तू कौल घे. मोठा मर्दाना शिपाई तुज नावाजितो.' ऐसे बोलीता मुरारबाजी बोलिला, 'तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय?' म्हणोनि नीट खानावरी चालिला. खानावरी तलवारीचा वार करावा तो खानने आपले तीन तीर मारून पुरा केला. तो पडला. मग खानाने तोंडात आंगोळी घातली, 'असा शिपाई खुदाने पैदा केला.'
ह्याच मुरारबाजींचा तेजोमय पुतळा आज ही रक्त सळसळवल्याशिवाय राहत नाही. आजही मुरारबाजींच्या पराक्रमाची ही जागा साक्ष देते. मुरारबाजींसमोर गारद देऊन शिवराय आणि शंभुराजांचा जयघोष करत आम्ही पुढ निघालो. हल्ली गारद देण्याची संधी मी सोडत नाही आणि आज बरोबर अस्नार्यांची संख्या पण खुप होती. त्यामुळ गड आवाजानी भरून गेला. जास्त आवाज करु नका अशी लष्कराच्या जवानांनी सांगीतल होत पण तस फारस मनावर घेतल नव्हत.
मूर्ती पासुन समोर गेल्यावर ब्रिटिशकालीन चर्च बघायल मिळतात. पुरंदरेश्वराच आणि रामेश्वराच दर्शन घेतल. पुढ असणार्या चौकीवर आमचे सर्वांचे मोबाईल आणि camera जमा केले. सुरक्षिततेच्या कारणासाठी. नो फोटो इच्छा नसताना सगळ जमा कराव लागल काही पर्याय नव्हता. चेक पोस्ट पासुन डावी कड़ वळुन गडाकड प्रस्थान केल. समोर लागत प्रवेश द्वार. बुरुज आणि तटबंदी अजुन तशी चांगल्या अवस्थेत आहे. पण वर वाढत चाललेल कॉंक्रेटच जंगल चिंताजनक आहे. वाड्यांचे अवशेष बघत पुढे पाण्याच्या टाक्यांना वळसा घालुन आम्ही बालेकिल्ल्यकड निघालो. दोन्ही बाजुला संरक्षक कठडे असणार्या ९२ पायर्या आपल्याला वर घेउन जातात. म्हणजे मी मोजल्या नाहीत वाचेलल कुठतरी . पायर्या थेट आपल्याला केदारेश्वराच्या अंगणात नेऊन सोडतात. ही पुरंदर वरील सर्वात उंच जागा.मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे.
भास्करराव डोक्यावर आले होते आणि पोटात कावळयांनी थैमान घालायला सुरवात केली होती. हीच ती सह भोजनाची वेळ. शाळा सोडल्यानंतर फक्त ट्रेक मधेच सहभोजन होत. आजचा बेत तर मोठा होता समविचारांच्या ४२ जनान बरोबर जेवन्याचा योग. अगदी भरपेट जेवण झाल. डबा न नेहतासुद्धा. जेवणानंतर इतिहासावर चर्चा रंगली अगदी शेंद्र्या बुरुज बांधताना दिलेल्या नरबळीपासुन ते अगदी उमाजी नाईकांपर्यंत. उमाजी नाईक पुरंदरचे किल्लेदार होते बर का ! ह्याच सह्याद्रीच्या सह्याय्यान इंग्रजांशी लढा दिला. फितूरी करऊन सरकारन त्यांना पकडल आणि फाशी दिली. चर्चा बरीच रंगली.
चर्चेनंतर जोरदार गारद देऊन दुर्गभ्रमंतीचा शेवट केला आणि आता परतीचा प्रवास सोबत किल्ल्याची स्वच्छता. केदारेश्वराच्या दारातुन आमची मोहिम चालु झाली. बाकी किल्ल्यांच्या तुलनेत कचरा कमी होता पण पाण्याच्या बाटल्या आणि प्लास्टिक पोटापुरत मिळालच. अगदी अडचणीच्या ठिकाणी जाऊनसुद्धा कचरा गोळा करणारे खरच मनाला भावले. फक्त फोटोसाठी किल्ल्यांवर येणारे वेगळे आणि कामाची तळमळ असणारे वेगळे. कायम डोक हलवनार्या दारूच्या बाटल्या इथ ही मिळाल्याच. एवढ्या चेकिंग मधे पण ह्या शंढांच्या औलादी हे घेउन वर कशा येतात काय माहीत ?
जेवढा सापडेल तेवढा कचरा गोळा करत माघारी चेकपोस्ट जवळ आलो. तिथुन जो सरळ रस्ता पुढ सरळ वज्रगडाकडे जातो. तिथ लष्कराच्या इमारती लागतात. उजव्या हाताला शंभुराजांच जन्मस्थान स्मारक आणि समोर शिवरायांच स्मारक आहे. वज्रगडावर जाण्यास जवानांनी बंदी केल्यामुळे तो बेत फसला. शिवरायांच दर्शन घेउन आम्ही शंभुराजांकड वळालो. बाहेर काढलेल्या रांगोळया दोन दिवसापुर्वीच झालेल्या शंभुराज्याभिषेकाची आठवण करून देत होत्या. इमारत तशी जुनीच झालीय भिंती मजबुत असल्या तरी छत मोडकळीस आलय. इथला कचरा साफ करून मूर्तीला जलाभिषेक घालुन वंदना दिली. अष्टगंध लावलेली ती राजांची मूर्ती अगदी तेजस्वी दिसत होती.
आता निरोपाची वेळ आलेली, खुप दिवसांनंतर दिवस अगदी हसत खेळत कॉलेजच्या आठवणी काढत आणि एकमेकांना चिडवत गेलेला. आता मात्र ते ४१ जण मुंबईकड आणि आम्ही पुण्याकड निघणार होतो. इच्छा नसताना त्यांची बस आणि आमची गंगी चालू झाली. खिडकीतुन निख्या किशाचा अन सच्याचा दंगा चललाच होता. मी अन मह्या मात्र गपचूप उतरला गाडी लाऊन चाललो होतो. डोक्यात मघाशी जवानानी उठवलेला तो प्रश्न थैमान घालतच होता, '' खरच शिवाजी महाराज आणि शंभु महाराज सगळयांना खरे खरे समजलेत ??? ''
इतिहास मराठी मातीचा परिवार !!! |
-----------------------------------------------------अभिजीत कदम---------------------------------------------------
0 comments: