_

_

Pages

Navigation Menu

कार्ल्याची लेणी आणि किल्ले विसापुर ......

वाढलेल्या उन्हामुळ गेल्या महिनाभरात कुठ जाणच होत नव्हत. अश्या वातावरणात मोठा ट्रेक करायचा तर नाईट ट्रेकच करावा लागणार पण त्यासाठी तेवढा प्रतिसाद पण भेटत नव्हता. फक्त चीड चीड वाढत होती. दोन तीन वीकेंड फक्त सातारा-पुणे-सातारा ह्यातच गेलेले. भटकायचा जाम मुड होता तो जो कीडा असतो तो गप्प बसु देत नव्हता. एक मे च्या सलग सुट्टीसाठी केलेला जंगली जयगडचा बेत पण फिसकटला. ह्यावेळी मात्र कुठतरी जायचच हे ठाम ठरलेल. जवळच कार्ले लेण्या पण हे ठिकाण दोन तास पुरेसे होते पुढच पुढ बघु म्हणुन निघालो.
शुक्रवारी दुपारी ठरल जाऊ उद्या सकाळी सहा साडेसहाला निघायच. मी सोमाटणे  टोलनाक्यावर वाट बघत बसलो. साडेसहा, सात, साडेसात  टोलनाक्याच्या शेजारच्या टेकडीवरच्या  बाप्पाचे फोटोपण काढुन झालेले. आता खरच वैतागलेलो. आठ वाजता प्रितम आणि प्रवीणच आगमन झाल.आणि आम्ही तिघ दोन घोड्यावर निघालो कार्ले लेण्याकडे ....




पुण्यापासुन ६६ किमी वर जुण्या मुंबई पुणे महामार्गावर कार्ले फाट्यावरून  उजवी कड़े  कार्ले लेण्यांकडे रस्ता जातो. डावीकडे वळल्यास  आपण विसापुर लोहगडाकडे जातो. कार्ले फाट्यावर मिसळ खाऊन आम्ही निघालो लेण्यांकडे. मिसळ खातेवेळी  निसर्गातल्या एका सुंदर प्राण्याचे दर्शन झाले.


रंग बदलणारा .....
काय तरी केमिकल लोचा असतो त्यामुळ हा रंग बदलतो.... स्वसंरक्षण अस जाडजुड कारण त्यामाग दिल जात ...विसापुर ला जाताना टिपलेला हा एक....अगदी तीन रंग स्पष्ट दिसतायेत.... पण मला तर वाटत आता ह्याचा नंबर माणसाच्या माग लागतो कारण अगदी स्वत:ला तुमचे बेस्ट बेस्ट म्हणणारे गरजेनुसार अगदी पद्धतशीर रंग बदलतातच की , ते पण केमिकल घोळ न होता.
लेण्यांशेजारीच आई एकवीरेच मंदिर असल्यान गर्दी बर्यापैकी होती. पंधरा वीस मिनिट पायर्या चढून गेल्यावर समोर भव्य लेण्या दिसतात. 
मुळातच लावण्यवती असणार्या एखाद्या सौदर्यवतीला दागिने घालुन सजवावे अगदी तसच काही सह्याद्री आणि त्यात असणार्या लेण्यांच्या बाबतीत. अनेक पाषाण कलाकारांनी आपली आयुष्य खर्ची घालुन ही लेणी तयार केली. कुठही चुक काढायला जागा सापडणार नाही अगदी दोरा घेउन मोजल तरी सगळ तंतोतंत. आजच्या युगालाही लाजवेल असच काही !!!




चैत्यगृहाच्या दाराशीच डाव्या हाताला एक सिंहस्तंभ कोरलेला आहे. भारतात अशोकाने असे स्तंभ उभे केले होते. या मालिकेतील सारनाथच्या धर्तीवर हा इथला सिंहस्तंभ कोरला आहे. हा स्तंभ पंचेचाळीस फूट उंचीचा आहे. त्याची बैठक वर्तुळाकार, आणि अंग सोळा कोनांमध्ये घडवलेले आहे. या स्तंभाच्या अग्रभागी एक वर्तुळाकार कळस दिसून येतो. त्यावर आमलक, हर्मिकेचा चौथरा आहे. या संचावर चार सिंहाची आकृती कोरलेली आहे. 





लेण्या बघुन झाल्यावर एकवीरा मातेच दर्शन घेतल. आत्ताशी फक्त अकरा वाजले होते पण इथ म्हणावी अशी शांतता नव्हती. त्यामुळ इथुन लगेच निघन्याचा निर्णय घेउन आम्ही खाली उतरलो. आता पुढ कुठ हे ठरल नव्हत. मग चलो विसापुर !!!


लोहगड आणि विसापुर ही दुर्गजोडी मळवली रेल्वे स्टेशन पासुन जवळ असल्याने पावसाळ्यात अगदी बागेत फिरायला याव अशी इथ मुंबई आणि पुण्यातल्या चिमण्याकावळ्यांनी गजबजलेली !!! हे किल्ले शांततेत जगायचे असतील तर उन्हाळाच बरा.पावसाळ्यात तीथ चालणारे प्रकार बघवत नाहीत. तस कॉलेजपासुन लोहगडला सहा सात वेळा जाण झाल होत. लोहगडला जाताना दिसणारी विसापुरची तटबंदी कायम आकर्षित करायची आत्ता त्याला मुहुर्त लागला होता.
दोन्ही किल्ल्यांच्या पायथ्यापर्यंत आता डांबरी रस्ता झालाय त्यामुळ हिकडची बिनकामाची पिकनिक स्पॉटवाली गर्दी आता वाढनार हे मात्र नक्की. मळवली स्टेशनपासुन वर घेउन येणारा डांबरी रस्ता भाजे लेणी, विसापुर आणि लोहगडला जोडतो. सपाटीवर  गेल्यावर एकाबाजुला लोहगड आणि दुसर्या बाजुला विसापुर अगदी एकमेकासमोर मांडी घालुन बसालेत अस भासतात. विसापुर म्हणल की आठवतात हरवाहरवी चे किस्से रस्ते न सापडल्याने वाटा चुकलेल्या लोकांच्या गोष्टी.विसापुर ला जाण्यासाठी जिथुन आपण फाटा घेतो तिथ एक छोट खानी हॉटेल आहे. दोन दोन कोकम सरबत पिउन आम्ही विसापुराकडे वळलो. पुढ गेल्यावर एक बंद असलेली टपरी लागेल तिथुन डावीकडे जा मग तिथुन पुढे गेला की दिशादर्शक बोर्ड तुम्हाला दिसतील कोकम सरबतवाल्या मावशीनी माहिती पुरवली. इथुन आत कच्चा रस्ता असल्यान जिथपर्यंत गाड्या जातील तीथपर्यंत गाड्या घेउन जाऊ अस ठरल. हां सगळ्यात सोपा मार्ग असावा कारण इथुन तटबंदी जवळच  दिसते. दुसरा एक मार्ग आहे त्यासाठी भाजे लेण्याजवळुन पायवाटेने जावे लागते. 
आम्ही मात्र हा सोपा मार्ग निवडला होता. मिळालेल्या माहितीनुसार टपरी लागली. पावसाळ्यातल सिजनेबल हॉटेल .. फळ्यांच्या डायनिंग टेबलवर बसुन करवंदासोबत रंगली इतिहासाची चर्चा. विषय लवकर संपणारे नव्हते, त्यामुळ आटपत घेऊन चालायला लागलो. जास्त गोंधळ ह्यामुळ उडतो की ह्या बाजुने नक्की वर जाणारा रस्ताच दिसत नाही. त्यामुळ पहिल्यांदा आम्ही सरळ चालत राहिलो. पण वर बरुजा वर  दिसणार्या भगव्याकडे बघून ही वाट वर जाइल अस वाटत नव्हत म्हणुन थोड चालुन माघार घेतली आणि पुन्हा माघारी जिथुन सुरुवात केलेली तिथे आलो. टपरीपासुन वीस पंचवीस फुटावर पाउलवाट  करवंदांच्या जाळीत जाते. त्या वाटेने आत शिरलो. थोडच चालुन पुढ आल्यावर एकाच वाटेला दोन तीन फाटे फुटल्यान आता रस्ता निवडण अवघड झाल पण बुरजा वरचा भगवा टारगेट  ठेउन उजवीकडे वळालो. थोड चालुन जाताच पुढ पाटी दिसली विसापुरकडे.


झाडी एकदम घनदाट असल्यामुळे में महिन्याच्या असल्या उन्हाळ्यात सुद्धा जमीनीवर उन्ह पडल नव्हत.घनदाट झाडी थंडगार वातावरण आता पडी मारण्याचा मोह आवरण खरच अवघड झाल. " आभाळ पांघरायला  भुई उशाला मग उद्याची फिकिर कशाला ???" तत्वान पडी मारलीच.


खरच ह्या जंगलान मन जिंकलेल. एकदम भारी वाटल हा फिल लोहगडा वर कधी भेटत नाही आणि पावसाळ्यात तर नाहीच नाही. मुंबई पुण्याच्या चिमण्यांचा अन त्यांच्यासोबतच्या कावळ्यांचा सो कोल्ड हिंग्लिश चिवचिवाट पावसाळ्यात अशा ठिकाणी वाढतो आणि मग जीव गुदमरल्यासारखा  होतो. आणि म्हणुनच उन्हाळ्यात हिकड आलो होतो आणि सह्याद्रीन नेहमीप्रमाने  अपेक्षेपेक्षा जास्तच दिल होत.
विसापुरला आता हिथुन पुढे दिशादर्शक बाण होते त्यामुळ पुढचा मार्ग चुकण्याचा संबंध नाही आला. वरती चढून आल्यावर कातळात पाण्याची टाकी लागतात. हिथुन पुढचा जो रस्ता आहे तो ओढ्याच्या पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेला आहे. त्यामुळे ह्या वाटेत मोठ मोठे दगड आहेत. दगडांनी संधनची आठवण करून  दिली.



 चढन खडी असल्यामुळ अगदी नाकासमोर आपण चढाई करत असतो. आतापर्यंत डोक्यावरची सावली पूर्ण गेलेली आणि जबरदस्त उन्ह लागतय दमुन एका मोठ्या दगडावर थांबतो. मागे वळुन बघितल्यावर दिसणार्या दृश्याने सगळा थकवा एका क्षणात हरवून जातो. लोहगड... तुंग... तिकोना... आणि पवनेच पाणीच पाणी !!!
लोहगड विसापुरवरून...



तुटलेल्या तटबंदीतुन किल्ल्यात प्रवेश केला. हीथ आधी दरवाजा असावा अस वाटत होत पण खुप माहिती शोधली पण तसा काही उल्लेख सापडलाच नाही. मोर्चा डावीकडे वळवला त्या बुरुजाकडे ज्या बुरुजावरच्या भगव्याकड बघत वर आलो होतो. गारद देऊन गड भ्रमंतीला सुरुवात केली. 


ऐतिहासिकदृष्टया विसापुरवर कोणत्या मोठ्या नोंदी आढळत नाहीत. पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांकडे गेला. नंतर तो मराठ्यांनी जिंकुन घेतला. पवनामावळात येणारा हा किल्ला लोहगडाच्या जोडीने लोणावळा घाटचे संरक्षणासाठी उभा आहे. लोहगडाच्या तिप्पट असणारा किल्ला तसा दुर्लक्षित म्हणतात पण ते मला पटत नाही कारण १८१८ मधे जेंव्हा इंग्रजांनी हा किल्ला घेतला त्याच्या दुसर्याच दिवशी मराठ्यांनी लोहगड स्वताहुन  खाली करून  दिला  यावरून  विसापुर चे  महत्व समजते. किल्ल्यावर आजही काही वाड्यांचे अवशेष दिसतात. असंख्य पाण्याची टाकी असल्या उन्हाळ्यातसुद्धा जलमय होती. पाणी मात्र पिण्यास योग्य नाही. विसापुरचा सर्वात आकर्षक भाग म्हणजे त्याची तटबंदी पाहताक्षणी प्रेमात पडायला भाग पाडणारी तटबंदी आजही  भक्कम आहे. आजपर्यंत लोहगडावरून  पाहिलेल्या तटांवर फिरताना आज एकदम भारी वाटत होते. गडावरच्या मारुतीरायाच दर्शन घेउन तटावरून किल्ल्याला चक्कर मारून परतीचा  प्रवास चालु केला. एक दिवस इतिहासात जगुन पुन्हा त्याच घिस्यापिट्या एसी आणि पीसी च्या जगात !!!!








0 comments: