उजडायला अजुन दोन तासांचा तरी अवधी असल. भल्या पहाटे देवपुजा उरकुन आईसाहेबांच्या हस्ते माथ्यावर चंद्रकोर लाऊन सदरा अडकवला. वर जरीच मुंडास बांधुन स्वारी तयार झाली.पाठीला ढाल अन कमरल तलवार लाऊन पायात कोल्हापुरी सरकवत उंबर्यातुन बाहेर पडलो.वाड्याच्या दारावर येतो तोच सदान गंगीला तयार करून पुढ आणली. जनावर एकदम उमद हीच अगदी पुर्वजन्माच नात. जात घोडीची पण माणसाच मन लाभलेली गंगी घोडी आमच्या पाग्यातल मला सगळ्यात जास्त आवडणारी. समोर येताच खुरान जमीन उकरू लागली. कमरची तलवार सावरत अन मिशिला ताव देत मी घोडिवर मांड टाकली. घोड्यावर मांड पक्की तरच तुम्ही जनावरावर राज्य करु शकाल मी ते शब्द विसरलो नव्हतो. गंगीन लगेच पुढच दोन पाय हवेत उचलुन मला प्रतिसाद दिला आज हिचा पण सुर वेगळाच जाणवत होता.
धुक्याला कापत आम्ही अंतर कापत होतो. गाव कधीच माग पडल होत. अन आम्ही सिंहगडाच्या वाटेला लागलेलो. अजुन सूर्य नारायणानी दर्शन दिल नव्हत. त्यामुळ गडाच दरवाज बंदच असणार होत. महाराजांचा तसा आदेशच होता. पायथ्यापासुनच तान्हाजीरावांच्या पराक्रमाला मनोमन मुजरा करून पाबे घाटाचा रस्ता धरला. ह्याच वाटेन शाहेस्तेखानावर हल्ला करून महाराज अन मावळ परतल होत. ही वाट बोम्बल्यान मला दाखवलेली. बोम्बल्या म्हंजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यातलाच शिलेदार असावा अस मला कायम वाटत. पाबे घाटाच्या माथ्यावरून तोरण्याच अन राजगडाच दर्शन झाल. आत्ताशी कुठ पूर्वेला तांबड फुटायला लागल होत. अन आम्ही राजगडाच्या दिशेन घोडदौड करत होतो. सूर्य नारायणाच दर्शन मला बालेकील्ल्यावरन घ्यायच होत. राजगड कायम मनात पुजला जातो महाराजांनी आयुष्याची बावीस वर्ष हीथ घालवली. मोठ्या मोठ्या मोहिमा हितनच निघाल्या. हीच स्वराज्याची पहिली राजधानी....गरुडाच घरट, राजियांचा गड अन गडांचा राजा.... राजगड !!!
घोडीवरून पायउतार होत राजमार्गान धाव घेत पाली दरवाजा गाठलासुद्धा !! दमछाक करणारा राजगड पण आज मी काही क्षणात वर आलो होतो. पद्मावती मातेचे दर्शन घेउन मोर्चा बालेकिल्ल्याकड वळवला.बालेकिल्ल्याच्या महाद्वाराच्या पायर्यांवर बसुन सुवेळा माचिवरुन रंगांची उधळण करत वर येणार्या भास्कररावांच दर्शन घेन म्हणजे नशीबच ... ह्याच द्वाराच्या कोपर्यात अफजलखानाच मुंडक पुरलय. आमच्या स्वराज्याकड वाईट नजरेन बघेल त्याची अशीच अवस्था होइल अशीच साक्ष तो दरवाजा देतोय. बालेकिल्ल्यावरून मावळाच दर्शन घेउन पुन्हा पद्मावती माचिवर येतो आणि राजमार्गा कड चालु लागलो. संजीवनी माची राहिली म्हणताय अहो ती आत्ताच नाय ...
खाली येउन आम्ही लगेच निघतो भोरकड... भोर वरंधा महाड अन लगेच रायगड.... धन्याच घर ...आमचा राजा रायगडी राहतो. भोर ओलंडुन वरांधात घुसलो की पावसाच्या सरी भिजउ लागतात. कोकणातुन आलेले ढग अगदी अलगत आम्हाला स्वर्गाची झलक दाखवतात. ढगातुनच घोडिवर बसुन समोरून आलेल ढग बाजुला सारत महाडात उतरतो. आता ओढ लागलेली असते महाराजांच्या दर्शनाची. लांबूनच रायगडाच अन् सह्यकड्याच रूप डोळ्यात साठवत ''मनात पूजिन रायगडा'' म्हणत नतमस्तक होतो आणि वळतो पाचाडाकड. आऊसाहेबांच्या दर्शनाला.राजमाता जिजाऊंसमोर नतमस्तक होतो. आजही पहिला मुजरा पाचाडात घालतो.
शरीरान जेंव्हा खुबलढा बुरुजाजवळ असतो तेंव्हाच मन धापा टाकत नाना दरवाजा ओलांडून महादरवाज्याला थाप मारत असते. वर आभाळालाही लाजवेल अशा डौलात फडकनारा भगवा जरीपटका उर भरून आणत असतो. महादरवाजा हिरोजीना मुजरा घालायला भाग पाडतो. रायगड बांधणारे हीरोजी. पुढ जात हत्ती तलाव, गंगासागर तलाव, आकाशाला भिडणारे मनोरे मराठ्यांचे ऐश्वर्य दाखवतात,आजही आम्हाला ते आकाशाला भिडलेले दिसतात. पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, राणीवसा माग टाकत, राजसदरेवर पोहचतो. नगारखान्यातुनच वाकुन तीन हाथ मुजरा घालत आत शिरतो अन् गगनभेदी गारद देतो...
"महाराज.....गडपती...गजपती...भूपती..अष्टावधानजागृत...अष्टप्रधानवेष्टित...न्यायालंकारभूषित...शस्त्रास्त्रशासत्रपारंगत...राजश्रियाविराजित..सकळकुळमंडळीत...राजनीतीधुरंधर...प्रौढप्रतापपुरंदर... क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर..महाराजाधिराज....राजा...शिवछत्रपती महाराजांचा विजय असो...''
राजसदरेवरून होळीच्या माळाकड निघतो. इथच शंभुराजानी होळीतुन नारळ काढला असल, अन् महाराजांनी मोठ्या अभिमानान शेरभर सोन्याच कड हातावर चढवल असल... बाजारपेठेतुन पुढ जात जगदीश्वराच्या दर्शनाला निघतो.जगाच्या ईश्वराच दर्शन घेउन पुढ जाउन माझ्या परमेश्वराच दर्शन घेतो. वाघबीळातुन येणारी गार हवा घेऊन माघारी फिरतो.
रायगडावरून पाय कधीच निघत नाही, तरीपण जड पावलांनी रायगड सोडतो. कोकणाची किनारपट्टी माझ्या ख़ास आवडीची. किनार्यावरून घोडी फेकत पुढ निघतो. मुरडाच्या किनार्यावरून जंजिरा दिसतो. त्याला पाहिल्यावर कधीच काही वाटत नाही त्याची काय ती किंमत ज्याला आमच्या राजांचे कधी चरणस्पर्श झालेच नाहीत.... अभागी रे तु अभागी !!! आलिबाग मधुन आंग्रेंच्या समाधीला वंदन करून घाट माथ्याकड दौड़ु लागलोय. मधेच राजमाची घनदाट जंगलातून खुणवत होता वाट वाकडी करून घोडी त्या घनदाट जंगलात दामटवत अनेक दरया-खोरी ओलंडुंन राजमाचीवर पोहचलो. राजमाचीच्या गुहेत थोडा आराम करुन सह्याद्रीच देखन रूप डोळ्यात साठवुन पुढ निघलो. इथुन खंडाळ्याचा घाट परिसर एकदम देखणा दिसतो. राजमाचीच्या पायथ्याच्या प्राचीन मंदिरातल्या महादेवाच दर्शन घेउन राजमाचीचा निरोप घेतला. त्याच पट्ट्यातल्या लोहगड विसापुराकड निघतो. न विसरता भाजे लेण्यातली कलाकुसर जगतो. पायथ्यापासुन दिसणारी लोहगडाची तटबंदी मोहात पाडते. कितीतरी द्वार ओलंडुन वर पोहचलो. लक्ष्मी कोठीची श्रीमंती जगुन विंचुकाट्याकड पळतो. समोरून वाहणारे ढग अंगावर घेत, विसापुर इथूनच डोळ्यात साठवतो.
सूर्य डोक्यावर आलेला असताना आठवण होते रतनवाडीच्या अमृतेश्वराची.पल्ला लांबचा पण घोडिला आता पंख लागल्यासारखी ती धाऊ लागली होती. जुन्नर नारायनगाव माग टाकुन खुबी फाट्यावरून रतनवाडीत पोहचलो पण ! अमृतेश्वराच हेमाडपंथी मंदिर कलाकुसरीचा अनोखा नमुना. लोक म्हणतात की हे मंदीर पांडवानी बांधल पण मला हे मान्य नाही ज्या कलाकारांनी त्यांच आयुष्य ह्यासाठी घालवल त्यांच्यावर अन्याय करायला मन धजवत नाही. मंदिराच्या परिसरातली पुष्कर्णी कायम लक्षात राहन्यासारखी. माग उभा असलेला रतनगड बोलवत होता. अन मी सहाजिकच तिकड चालु लागलो. उन्ह वाढली होती. रतनगडाच्या गुहेतुन सह्याद्रीच्या रांगा न्याहाळुन गणपती कोरलेल्या दरवाज्यातुन किल्ल्यात प्रवेशलो. समोर दिसत होत सह्याद्रीच अजुन एक रूप. समोर कात्राबाईचा कडा अन खाली खोलच खोल दरी ढग वरून कसे दिसतात ते इथ समजत. नेढ्यात बसुन पुढ निघालो. रतनगडाच हे प्रवेशद्वार म्हणजे तोंडात बोट घालायला लावणारी जागा. थोडी जरी नजर चुकली की कपाळमोक्षच. बाणाच्या सुळक्याला वळसा घालुन खाली उतरलो.
पोटात कावळ्यांनी थैमान घालायला सुरुवात केली. सह्याद्रीत असताना कुणाचही दार ठोठवा तुम्हाला अगदी जावायासारखा पाहुनचार भेटणार कारण सह्याद्री अन स्वराज्य कधीच कुणाला उपाशी ठेवत नाहित. पोटोबा करून सह्याद्रीच्या चमत्काराच्या दिशेने निघालो संधन दरीच्या दिशेने. संधन म्हणजे गूढ़ अकल्पित आणि कधीही न सुटलेल सह्याद्रीच कोड ! अशा किती जागा सह्याद्रीच्या पोटात लपुन बसल्यात कोणास ठाऊक ??? ह्या जागेच वर्णन करायला शब्द नाहीत. साम्रद मधे आल्यावर अलंग मदन कुलंग हसत आमंत्रन देत असतो. आत्ताच नाही पुन्हा नक्की येईन म्हणुन मी निघालो हरिश्चंद्रगडाकड ! अजुन एक हेमाडपंथी मंदीर, लहान लहान खुप मंदिर आणि पाण्यातला केदारेश्वर ! छाती एवढ्या पाण्यातून केदारेश्वराला प्रदक्षिणा घातली. इथला बाप्पा हृदयात राहतो. हाच खरा देव. साध्या फुलाचीसुद्धा अपेक्षा न करता उन्हापावसात हजार वर्ष अस्तित्व टिकऊन आहे. आता वेळ कोकणकड्याची !! कोकणकड्यावर गेल्यावर गरुडरुपी मन आभाळात घिरट्या घ्यायला लागत. ह्यापेक्षा सुंदर काही असुच शकत नाही !!
हरिश्चंद्राची कलाकुसर भुलेश्वराची आठवण करून देतो आणि मी भुलेश्वराच्या गाभार्यात पोहचलो सुद्धा !! ह्याइथली कला म्हणजे मानवरूपात येउन देवाने केलेला दैवी चमत्कार !!
पलीकडच जेजुरीत खंडेराया सह्याद्रीच्या संगतीत राहतो.खंडेरायासमोर माथा टेकुन माथी भंडारा लाऊन सासवडला बगल देऊन पुरंदरवर पोहचलो. धाकट्या धन्याला मुजरा करून बालेकील्ल्यावर फेरफटका मारला. भास्करराव आता परतीच्या वाटेला लागलेले. संध्याकाळची वेळ जवळ यायला लागली की आठवण होते संजीवनी माचीची !! गडबडीत बालेकिल्ल्याला बगल देऊन पळत पळत संजीवनी माचीवर येउन बसलो. ह्या जागेवरून भास्कररावांना निरोप देन म्हणजे स्वर्गसुख !!!
कधीच कोणी मधे अडथळा आणु नये कायम इथच बसुन भास्कर रावांन बरोबर बोलत बसाव अस वाटत असतानाच मला मागुन कोणीतरी जोरजोरात हलवत होत मी म्हणत होतो थोडा वेळ अजुन फक्त थोडा वेळ बसु दया ती आकाशाची भगवी किनार मला बघु दया.
पण मागचा आवाज आता खुपच वाढला होता, " अरे उठ ना.. नऊ वाजलेत रविवार असला म्हणुन काय कोणी एवढा वेळ झोपत का ??? " मी मात्र एकटाच गालातल्या गालात हसत होतो. किती आळशी तु अस आई म्हणत होती पण तिला कस सांगणार ही स्वारी आत्ताच कुठुन दौड मारून आली होती. सांगितल असत तरी तीच उत्तर मला माहीत होत , "वेडा आहेस तु" हे ठरलेल..
खरच असेल तस कदाचित कारण आत्ता मी इथ असतो तर लगेच रायगडावर राजदरबारात .... कधी टकमक टोकावर तर कधी कोकण कड्यावर... कधी जगदीश्वराच्या गाभार्यात तर कधी भुलेश्वराच्या .... कधी हरिश्चंद्रेश्वरासमोर नतमस्तक तर कधी अमृतेश्वरासमोर....कधी रायगडावर महाराजांनसमोर तर कधी तुळापुरात वढुत शंभु राजांसमोर... कधी नगारखान्यासमोर महाराजांच्या राज्याभिषेकात तलवार नाचवत तर कधी लक्ष्मी रोडवर बाप्पासाठी ढोल वाजवत ..... असाच आहे मी अगदी आई म्हणते तसाच ...
0 comments: