_

_

Pages

Navigation Menu

Showing posts with label bhatkanti. Show all posts

कार्ल्याची लेणी आणि किल्ले विसापुर ......

वाढलेल्या उन्हामुळ गेल्या महिनाभरात कुठ जाणच होत नव्हत. अश्या वातावरणात मोठा ट्रेक करायचा तर नाईट ट्रेकच करावा लागणार पण त्यासाठी तेवढा प्रतिसाद पण भेटत नव्हता. फक्त चीड चीड वाढत होती. दोन तीन वीकेंड फक्त सातारा-पुणे-सातारा ह्यातच गेलेले. भटकायचा जाम मुड होता तो जो कीडा असतो तो गप्प बसु देत नव्हता. एक मे च्या सलग सुट्टीसाठी केलेला जंगली जयगडचा बेत पण फिसकटला. ह्यावेळी मात्र कुठतरी जायचच हे ठाम ठरलेल. जवळच कार्ले लेण्या पण हे ठिकाण दोन तास पुरेसे होते पुढच पुढ बघु म्हणुन निघालो.
शुक्रवारी दुपारी ठरल जाऊ उद्या सकाळी सहा साडेसहाला निघायच. मी सोमाटणे  टोलनाक्यावर वाट बघत बसलो. साडेसहा, सात, साडेसात  टोलनाक्याच्या शेजारच्या टेकडीवरच्या  बाप्पाचे फोटोपण काढुन झालेले. आता खरच वैतागलेलो. आठ वाजता प्रितम आणि प्रवीणच आगमन झाल.आणि आम्ही तिघ दोन घोड्यावर निघालो कार्ले लेण्याकडे ....




पुण्यापासुन ६६ किमी वर जुण्या मुंबई पुणे महामार्गावर कार्ले फाट्यावरून  उजवी कड़े  कार्ले लेण्यांकडे रस्ता जातो. डावीकडे वळल्यास  आपण विसापुर लोहगडाकडे जातो. कार्ले फाट्यावर मिसळ खाऊन आम्ही निघालो लेण्यांकडे. मिसळ खातेवेळी  निसर्गातल्या एका सुंदर प्राण्याचे दर्शन झाले.


रंग बदलणारा .....
काय तरी केमिकल लोचा असतो त्यामुळ हा रंग बदलतो.... स्वसंरक्षण अस जाडजुड कारण त्यामाग दिल जात ...विसापुर ला जाताना टिपलेला हा एक....अगदी तीन रंग स्पष्ट दिसतायेत.... पण मला तर वाटत आता ह्याचा नंबर माणसाच्या माग लागतो कारण अगदी स्वत:ला तुमचे बेस्ट बेस्ट म्हणणारे गरजेनुसार अगदी पद्धतशीर रंग बदलतातच की , ते पण केमिकल घोळ न होता.
लेण्यांशेजारीच आई एकवीरेच मंदिर असल्यान गर्दी बर्यापैकी होती. पंधरा वीस मिनिट पायर्या चढून गेल्यावर समोर भव्य लेण्या दिसतात. 
मुळातच लावण्यवती असणार्या एखाद्या सौदर्यवतीला दागिने घालुन सजवावे अगदी तसच काही सह्याद्री आणि त्यात असणार्या लेण्यांच्या बाबतीत. अनेक पाषाण कलाकारांनी आपली आयुष्य खर्ची घालुन ही लेणी तयार केली. कुठही चुक काढायला जागा सापडणार नाही अगदी दोरा घेउन मोजल तरी सगळ तंतोतंत. आजच्या युगालाही लाजवेल असच काही !!!




चैत्यगृहाच्या दाराशीच डाव्या हाताला एक सिंहस्तंभ कोरलेला आहे. भारतात अशोकाने असे स्तंभ उभे केले होते. या मालिकेतील सारनाथच्या धर्तीवर हा इथला सिंहस्तंभ कोरला आहे. हा स्तंभ पंचेचाळीस फूट उंचीचा आहे. त्याची बैठक वर्तुळाकार, आणि अंग सोळा कोनांमध्ये घडवलेले आहे. या स्तंभाच्या अग्रभागी एक वर्तुळाकार कळस दिसून येतो. त्यावर आमलक, हर्मिकेचा चौथरा आहे. या संचावर चार सिंहाची आकृती कोरलेली आहे. 





लेण्या बघुन झाल्यावर एकवीरा मातेच दर्शन घेतल. आत्ताशी फक्त अकरा वाजले होते पण इथ म्हणावी अशी शांतता नव्हती. त्यामुळ इथुन लगेच निघन्याचा निर्णय घेउन आम्ही खाली उतरलो. आता पुढ कुठ हे ठरल नव्हत. मग चलो विसापुर !!!


लोहगड आणि विसापुर ही दुर्गजोडी मळवली रेल्वे स्टेशन पासुन जवळ असल्याने पावसाळ्यात अगदी बागेत फिरायला याव अशी इथ मुंबई आणि पुण्यातल्या चिमण्याकावळ्यांनी गजबजलेली !!! हे किल्ले शांततेत जगायचे असतील तर उन्हाळाच बरा.पावसाळ्यात तीथ चालणारे प्रकार बघवत नाहीत. तस कॉलेजपासुन लोहगडला सहा सात वेळा जाण झाल होत. लोहगडला जाताना दिसणारी विसापुरची तटबंदी कायम आकर्षित करायची आत्ता त्याला मुहुर्त लागला होता.
दोन्ही किल्ल्यांच्या पायथ्यापर्यंत आता डांबरी रस्ता झालाय त्यामुळ हिकडची बिनकामाची पिकनिक स्पॉटवाली गर्दी आता वाढनार हे मात्र नक्की. मळवली स्टेशनपासुन वर घेउन येणारा डांबरी रस्ता भाजे लेणी, विसापुर आणि लोहगडला जोडतो. सपाटीवर  गेल्यावर एकाबाजुला लोहगड आणि दुसर्या बाजुला विसापुर अगदी एकमेकासमोर मांडी घालुन बसालेत अस भासतात. विसापुर म्हणल की आठवतात हरवाहरवी चे किस्से रस्ते न सापडल्याने वाटा चुकलेल्या लोकांच्या गोष्टी.विसापुर ला जाण्यासाठी जिथुन आपण फाटा घेतो तिथ एक छोट खानी हॉटेल आहे. दोन दोन कोकम सरबत पिउन आम्ही विसापुराकडे वळलो. पुढ गेल्यावर एक बंद असलेली टपरी लागेल तिथुन डावीकडे जा मग तिथुन पुढे गेला की दिशादर्शक बोर्ड तुम्हाला दिसतील कोकम सरबतवाल्या मावशीनी माहिती पुरवली. इथुन आत कच्चा रस्ता असल्यान जिथपर्यंत गाड्या जातील तीथपर्यंत गाड्या घेउन जाऊ अस ठरल. हां सगळ्यात सोपा मार्ग असावा कारण इथुन तटबंदी जवळच  दिसते. दुसरा एक मार्ग आहे त्यासाठी भाजे लेण्याजवळुन पायवाटेने जावे लागते. 
आम्ही मात्र हा सोपा मार्ग निवडला होता. मिळालेल्या माहितीनुसार टपरी लागली. पावसाळ्यातल सिजनेबल हॉटेल .. फळ्यांच्या डायनिंग टेबलवर बसुन करवंदासोबत रंगली इतिहासाची चर्चा. विषय लवकर संपणारे नव्हते, त्यामुळ आटपत घेऊन चालायला लागलो. जास्त गोंधळ ह्यामुळ उडतो की ह्या बाजुने नक्की वर जाणारा रस्ताच दिसत नाही. त्यामुळ पहिल्यांदा आम्ही सरळ चालत राहिलो. पण वर बरुजा वर  दिसणार्या भगव्याकडे बघून ही वाट वर जाइल अस वाटत नव्हत म्हणुन थोड चालुन माघार घेतली आणि पुन्हा माघारी जिथुन सुरुवात केलेली तिथे आलो. टपरीपासुन वीस पंचवीस फुटावर पाउलवाट  करवंदांच्या जाळीत जाते. त्या वाटेने आत शिरलो. थोडच चालुन पुढ आल्यावर एकाच वाटेला दोन तीन फाटे फुटल्यान आता रस्ता निवडण अवघड झाल पण बुरजा वरचा भगवा टारगेट  ठेउन उजवीकडे वळालो. थोड चालुन जाताच पुढ पाटी दिसली विसापुरकडे.


झाडी एकदम घनदाट असल्यामुळे में महिन्याच्या असल्या उन्हाळ्यात सुद्धा जमीनीवर उन्ह पडल नव्हत.घनदाट झाडी थंडगार वातावरण आता पडी मारण्याचा मोह आवरण खरच अवघड झाल. " आभाळ पांघरायला  भुई उशाला मग उद्याची फिकिर कशाला ???" तत्वान पडी मारलीच.


खरच ह्या जंगलान मन जिंकलेल. एकदम भारी वाटल हा फिल लोहगडा वर कधी भेटत नाही आणि पावसाळ्यात तर नाहीच नाही. मुंबई पुण्याच्या चिमण्यांचा अन त्यांच्यासोबतच्या कावळ्यांचा सो कोल्ड हिंग्लिश चिवचिवाट पावसाळ्यात अशा ठिकाणी वाढतो आणि मग जीव गुदमरल्यासारखा  होतो. आणि म्हणुनच उन्हाळ्यात हिकड आलो होतो आणि सह्याद्रीन नेहमीप्रमाने  अपेक्षेपेक्षा जास्तच दिल होत.
विसापुरला आता हिथुन पुढे दिशादर्शक बाण होते त्यामुळ पुढचा मार्ग चुकण्याचा संबंध नाही आला. वरती चढून आल्यावर कातळात पाण्याची टाकी लागतात. हिथुन पुढचा जो रस्ता आहे तो ओढ्याच्या पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेला आहे. त्यामुळे ह्या वाटेत मोठ मोठे दगड आहेत. दगडांनी संधनची आठवण करून  दिली.



 चढन खडी असल्यामुळ अगदी नाकासमोर आपण चढाई करत असतो. आतापर्यंत डोक्यावरची सावली पूर्ण गेलेली आणि जबरदस्त उन्ह लागतय दमुन एका मोठ्या दगडावर थांबतो. मागे वळुन बघितल्यावर दिसणार्या दृश्याने सगळा थकवा एका क्षणात हरवून जातो. लोहगड... तुंग... तिकोना... आणि पवनेच पाणीच पाणी !!!
लोहगड विसापुरवरून...



तुटलेल्या तटबंदीतुन किल्ल्यात प्रवेश केला. हीथ आधी दरवाजा असावा अस वाटत होत पण खुप माहिती शोधली पण तसा काही उल्लेख सापडलाच नाही. मोर्चा डावीकडे वळवला त्या बुरुजाकडे ज्या बुरुजावरच्या भगव्याकड बघत वर आलो होतो. गारद देऊन गड भ्रमंतीला सुरुवात केली. 


ऐतिहासिकदृष्टया विसापुरवर कोणत्या मोठ्या नोंदी आढळत नाहीत. पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांकडे गेला. नंतर तो मराठ्यांनी जिंकुन घेतला. पवनामावळात येणारा हा किल्ला लोहगडाच्या जोडीने लोणावळा घाटचे संरक्षणासाठी उभा आहे. लोहगडाच्या तिप्पट असणारा किल्ला तसा दुर्लक्षित म्हणतात पण ते मला पटत नाही कारण १८१८ मधे जेंव्हा इंग्रजांनी हा किल्ला घेतला त्याच्या दुसर्याच दिवशी मराठ्यांनी लोहगड स्वताहुन  खाली करून  दिला  यावरून  विसापुर चे  महत्व समजते. किल्ल्यावर आजही काही वाड्यांचे अवशेष दिसतात. असंख्य पाण्याची टाकी असल्या उन्हाळ्यातसुद्धा जलमय होती. पाणी मात्र पिण्यास योग्य नाही. विसापुरचा सर्वात आकर्षक भाग म्हणजे त्याची तटबंदी पाहताक्षणी प्रेमात पडायला भाग पाडणारी तटबंदी आजही  भक्कम आहे. आजपर्यंत लोहगडावरून  पाहिलेल्या तटांवर फिरताना आज एकदम भारी वाटत होते. गडावरच्या मारुतीरायाच दर्शन घेउन तटावरून किल्ल्याला चक्कर मारून परतीचा  प्रवास चालु केला. एक दिवस इतिहासात जगुन पुन्हा त्याच घिस्यापिट्या एसी आणि पीसी च्या जगात !!!!








रंगीला राजस्थान !!! भाग ३ (जोधपुर)

१ जानेवारी आजपासुन खरया फिरण्याची सुरुवात होणार होती. सकाळी लवकरच  म्हणजे साधारण नऊ वाजता आवरून  बाहेर पडलो. पेटपुजेसाठी  धाड घातली जनता स्वीट होम वर .. एक से बढकर एक पदार्थ ... एकाएकाची टेस्ट करत जवळ-जवळ  नाश्त्याबरोबर आम्ही जेवणही उरकून घेतल. तोपर्यंत काल ठरवलेली गाडी आली आणि आमचा जोधपुर दर्शन प्रवास सुरु झाला.
उमेद भवन पँलेसपासुन सुरुवात करून  रात्री सूर्यास्त मेहरानगडवरून  बघायचा  असं  ठरलेल ..

उमेद भवन पँलेस... 
एकोनविसाव्या शतकाच्या सुरुवातीला  पडलेल्या दुष्काळात लोकांना काम मिळावे म्हणून ह्याचे बांधकाम सुरु करण्यात आले होते. उमेद सिंह यांच्या नावाने ही वास्तु बांधण्यात आली. १९२९ साली चालु झालेले बांधकाम १९४३ साली पूर्ण झाले. हेनरी वॉर्न या इंग्रज अभियांत्याने त्याची स्थापत्यकला पूर्ण पणाला लाउन ह्याची उभारणी केलिय. त्याने तयार केलेली स्केचेस आणि ड्राइंग आजही आपणास तिथे बघायला भेटतात. उमेद भवन हे जगातील मोठ्या खाजगी निवासापैकी एक आहे. तब्बल ३४७ खोल्या तिथ आहेत. सध्या उमेद भवन तीन भागात विभागल गेलय एका छोट्या भागात संग्रहालय, दुसर्या भागात
होटेल    आणि तिसर्या भागात राजा उमेद सिंह यांचे वंशज गजसिंह राहतात. इथ असणार जुन्या चार चाकी गाड्यांचा ( vintage car collection ) असलेल संग्रहालय पाहन्यासारख आहे.त्याची भव्यता खालील फोटोमधुन लक्षात येतच....









मंडोर किल्ला 
मंडोर जोधपुरपासुन पूर्वेला ९ किमी. वर असणारी मारवाड राज्याची जुनी राजधानी. नंतरच्या काळात राव जोधा यांनी जोधपुर शहराची स्थापना केली आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव राजधानी नंतर बांधलेल्या मेहरानगड किल्ल्यावर हलवली. आजही आपणास राठोड शासकांच्या समाध्या इथ पहावयास मिळतात. येथे असणारी ऐतिहासिक बाग आजही एकदम व्यवस्थित जतन केलेली आहे. इथ गेल्यावर फक्त माकडांपासुन सावध रहा !!!








जसवंत थडा - राजा जसवंत सिंह द्वितीय (१८३७-१८९५)  यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र राजा सरदार सिंह यांनी ही वास्तु बांधली. राजा जसवंत सिंह ह्यांच्या आधी राजघराण्यातील लोकांचे अंतिमसंस्कार मंडोर मधे होत असत. जसवंतसिंह ह्यांच्या इच्छे नुसार त्यांचा अंतिमसंस्कार देवकुंडच्या किनारी करण्यात आले.लाल दगडाच्या चबुतर्यावर संगमरवरामध्ये ही वास्तु बांधलीय. ह्या समाधिच्या परिसरात अजुन काही राजे आणि रान्यांच्या समाध्या आहेत. कारंज्यांची विविधपुर्ण रचना आणि फूल झाडांमुळे समोरचा बगीचा उठुन दिसतो. आत प्रवेश केल्यावर एक मोठी खोली आहे जी दोन भागात विभागलीय एका भागात राजांची चित्र आणि दुसर्या भागात जसवंतसिंह यांची समाधी आहे. इथुन मेहरानगड अगदी विलोभनीय दिसतो. ही वास्तु आणि मेहरान गड यांना जोडनारया रस्त्यावर जोधा राव यांचा पुर्नाकृती पुतळा आहे.




मेहरानगड किल्ला - जोधपुर शहराची शान असणारा हां किल्ला राव जोधा यांनी बांधला आणि राव जोधा यांच्यानंतर  सुद्धा ह्या किल्ल्याचा विस्तार होत राहिला. सुरुवातीच्या काळात दोन महाद्वार असणारा किल्ल्याला आता आठ महाद्वार आहेत जो राठोड राजघरान्याचा पाचशे वर्षांचा इतिहास सांगतो.मंडोरनंतर हा किल्ला राठोड साम्राज्याचा केंद्रबिंदु  राहिला. किल्ल्याच नाव सुर्यावरून पडलय ते कस तर सूर्य म्हणजे 'मिहिर'(संस्कृत शब्द) , मिहिरला राजस्थानी भाषेत मेहर अस म्हणतात आणि राठोड राज्यकर्ते स्वत:ला सुर्यवंशी मानत म्हणुन मेहरानगड!!!


किल्ल्यात जाताना गाइड घ्याच त्यामुळे भरपूर माहिती भेटते. आणि गाइड जरी नाही घेतला तरी प्रत्येक ठिकाणी माहितीफलक लावलेले आहेत. गाइड नसेल तर तुम्हाला किल्ल्यात हवा तितका वेळ फिरता येत हा एक गाइड न घेण्याचा फायदा होतो. किल्ल्यात वरच्या मजल्यावर जाण्यासाठी इथ आता लिफ्ट बसवली गेलीय.





जयपोल आणि फतेहपोल ही महाद्वार अनुक्रमे जयपुर आणि मुघली सेनेवर मिळवलेल्या विजयाची प्रतिक म्हणून बांधली गेलियेत.वर असणार्या तोफा आजही ताकतिची जाणीव करून  देतात.  इथ असणार संग्रहालय हे भारतातील मोठ्या संग्रहालयापैकी एक आहे. इथ आपणास वेगवेगळी हत्यार, युद्ध पोशाख, पालख्या, पाळणे , जुनी नानी, जुन्या तोफा, वस्त्र,चित्र (पेंटिंग्स) बघायला मिळतात.






इथ असणारे वेगवेगळे महाल पाहन्यासारखे आहेत ज्या मधे झाकी महल, शीश महल, मोती महल, फुल महल यांपैकी काहींची छायाचित्रे खाली जोडत आहे.
झाकी महल




शीश महल




मोती महल




फुल महल




एका दालनात एका जर्मन कलाकारने  काढलेले दुर्गादास राठोड यांचे बोलके चित्र आहे. हेच दुर्गादास छत्रपती संभाजी महाराजांकडे औरंगजेबाविरुद्ध लढन्यासाठी मदत मागायला आले होते राजकुमार अजितसिंह यांना बरोबर घेउन. अजीतसिंह हे जसवंतसिंह पहिले यांचे पुत्र. जे मिर्जाराजांसोबत मराठ्यां विरुद्ध चालुन आले होते आणि मराठा फौजेने त्यांची दानादान उडवली होते ते राजा जसवंत सिंह !!! ही माहिती न विसरता गाइडच्या माहितीत मी सांगुन टाकली.





साधारणत: पाचच्या सुमारास किल्ला पूर्ण फिरून  झाला . ढगाळ वातावराणामुळे  किल्ल्यावरुन सूर्यास्त बघायचा बेत फिसकटला. पण किल्ल्यातुन पुर्ण निळ दिसणार जोधपुर शहर आकर्षक वाटत होत.




किल्ल्यावरून दिसणारा क्लॉक टॉवर 



किल्ल्याच्या पायथ्याला असणार्या  कँफेत मस्त नाश्ता करून  आम्ही मेहरानगडला निरोप दिला. वेळ भरपुर असल्यामुळे गाडीवाल्याला बाय बाय करून  पायी यात्रा चालु केली. रस्ता नेहमीप्रमाणे माहितच नव्हता. GPS आणि विन्या असल्यान हॉटेल शोधण अवघड नव्हत. गल्लीबोळ पार करत दिड दोन तास फिरत फिरत हॉटेलवर पोहचलो.

एवढे राजवाडे पाहिले पण काहीतरी अपुर्ण असल्यासारख वाटत होत. त्यात सगळ असुन काहीतरी नसल्या सारख वाटत होत. शेवटी न राहुन फेसबुक वर स्टेटस पडलाच.... फीलिंग  मिसिंग ..... " थाट राजेशाही पण राजगड रायगडीची आपुलकी नाही" अहो कितीही काहीही झाल तरी आमच इमान फक्त रायगडाच्या मातिशीच !!!

राजस्थानात आलोय तर राजस्थानी दाल-भाटी वर ताव मारलाच पाहिजे. पुन्हा शोधमोहीम चालु ....काल पाल हवेली आणि आज दाल-भाटी साठी स्पेशल एक छोटेखानी हॉटेल.... दाल-भाटी देसी घी में.... त्यानंतर रबडी आणि स्पेशल राजस्थानी कुल्फी .... कुल्फी खात खात हॉटेलपर्यंत पायी वारी...... दिवस सुफल संपन्न !!!!

रंगीला राजस्थान !!! भाग २

अगदी वेळेवर आलेल्या गाडीने सुरवात चांगली झाली. आजुबाजुला असणार पब्लिक चांगल होत ही दूसरी समाधानकारक गोष्ट !!! त्यामुळ बावीस तासाचा प्रवास कधी संपला ते समजलच नाही (घ्या समजुन). रात्री महाराष्ट्रात लागलेल्या डुलक्याने डायरेक्ट गुजरात मधेच पोहचवले. रात्रीत मोदींच गुजरात ओलांडून सकाळी दहाच्या सुमारास राजस्थानात प्रवेश केला. आता मात्र जेवढ्या लांब नजर जाईल तितक्या लांबच दिसत होत. अगदी पृथ्वीवर सोनेरी चादर पसरावी अगदी तसेच !!! बोलण्यासाठी हे ठीक होत पण लांब लांब पर्यंत हिरवळ दिसत नव्हती. हिकडचे डोंगरपण ओबडधोबड , रचना अगदीच विचित्र लांबून फक्त दगडांचा ढीग मांडावा तसे दिसत होते अगदी उघडे बोडके !!

   



एकही स्टेशन अस गेल नाही जिथ विण्यान काही खाऊ घातल नाही. हा प्रवास फक्त खादाड प्रवास होता. माहितीसह आमचा प्रवास चालला होता विन्या त्याच विकिपीडिया नाव सिद्ध करत होता. फोटोसेशन ... बडबड.... धिंगाना (गाण्यांच्या भेंड्या असला पांचटपणा  नाही बर का ! ) करत एकदम मस्त प्रवास चालु होता. खिडकीतुन दोन तीन वेळा मोरांचे दर्शन सुद्धा झाले होते. लांबच लांब वाळवंट ... अधुनमधुन लागणारी रंगीबेरंगी गाव.... रंगबिरंगी राजस्थानी फेटे अन जरिकाम केलेल्या छोटे छोटे आरसे लावलेल्या साड्या असे पारंपरिक वेशभूषा केलेले सगळे अनओळखी चेहरे !!!



मजल दरमजल करत बावीस तासांचा प्रवास करून , जवळजवळ ११०० किलोमीटरच अंतर कापुन आम्ही जोधपुरात प्रवेश केला. राव जोधा यांच्या नावावरून  जोधपुर हे नाव पडल ( जोधा अकबर यांमधील जोधांचा काही संबंध नाही !!!)  भगत की कोठी BGKT जंक्शनवर आम्ही उतरलो. तिथुन जवळच नरेशच्या ओळखीने हॉटेल बघुन ठेवल होत. गाडी करून  सरळ  हॉटेलवर पोहचलो. नरेशच्या मारवाडी भाषेचा पुरेपुर फायदा आम्हाला होत होता. स्टेशन वरून आम्हाला घेउन जाणारी हीच गाडी दुसर्या दिवशीसाठी ठरवुन टाकली. हॉटेल नरेशच्या पाहुन्यातलच असल्यामुळ अगदी घरच्यासारख वाटत होत. फ्रेश होउन लगेच आम्ही भटकायला बाहर पडलो. ३० तारखेला  सकाळी ६.३० ते ४.०० ऑफिस करून  नंतर एवढा  प्रवास पण थकवा नावाला ही जाणवत नव्हता.

३१ डिसेंबर .... संध्याकाळी बाहेर पडलो. टारगेट होत फक्त निवांत भटकायच आणि शेवटी एखाद मस्त हॉटेल बघुन पेटपुजा करून रूमवर  माघारी यायच. ३१ डिसेंबरचे रंग वातावरणात दिसत होते.  बाजारपेठातुन फिरून  आम्ही  घंटाघर (clock tower) जवळ आलो. यावर दिलेल्या लाइट इफ़ेक्टमुळे अंधारात अगदी उठुन दिसत होता.
पोट नावाच्या अवयवात आता हालचाल चालु झालेली कावळे ओरडू लागले होते. मग आमचा मोर्चा वळला हॉटेलकडे !! पाल हवेली हॉटेल... हवेलीत चालु केलल  एक प्रशस्त हॉटेल.एकदम राजेशाही थाटात. एका बाजुला छोटस संग्रहालय आणि टेरेसवर  हॉटेल. तिथुन मागच्या बाजुला दिसणारा मेहरानगढ किल्ला त्यावरची ती विलोभनीय लायटिंग आणि नववर्षाच्या स्वागताला चाललेली फटाक्यांची आतिशबाजी  !!! आणि जेवताना फिरंग्यांची सोबत आणि त्यांच चाललेल त्यांच्या नववर्षाच त्यांच्या  पद्धतीन  स्वागत !!!
तुडुंब जेवण करून  रात्री एक वाजता जोधपुरच्या गल्ली बोळातुन रस्ते हुडकत रूमवर आलो .



Continue .....................................................

रंगीला राजस्थान !!! भाग १ पुर्वतयारी


२०१४ ला निरोपाची ट्रिप महाराष्ट्राच्या बाहेर काढायची. मागच्या वर्षी पाच दिवस कोकणात घालवले म्हणन्यापेक्षा गाजवले होते. पाच दिवस बाईक वर कोकण पिंजुन काढला होता. अगदीच येणारया नवीन वर्षाचे स्वागत वगेरे असल कौतुक नाही पण येणार्या सलग सुट्ट्यांचा सदुउपयोग म्हणा हव तर.... तसही हल्ली भटकायला कोणत्या कारणांची गरज हल्ली लागतच नाही. अगदी जुलै ऑगस्ट पासुन चर्चा मेलामेली चालु झाली होती.  कधी जायच हे ठरल होत पण कुठ हे लवकर ठरत नव्हत. आणि सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न होता येणार कोण कोण ???? त्यासाठी लीगली पूर्ण ग्रुप ला मेल टाकण्याच काम विनयन  अगदी पद्धतशीर केल. विनय आमच्या ग्रुप चा असल्या बाहेरच्या उचापतीसाठीचा मँनेजर !!! खरतर हा मेल फक्त वातावरण तापवन्यासाठीच होता कारण कुठ जायच हे अजुन तरी ठरल नव्हत. बारा जणांना  मेल गेले. जायच कुठ हा प्रश्न अजुन तसाच होता. घरचे मागच्याच वर्षी केरळला जाउन आलेले तिकडचे फोटो बघुन केरळ माझ्या डोक्यात घुमत होत. तशी मी विन्याला पण पीन मारली आणि आमच सर्चिंग चालु झाल. काहिकेल्या केरळ आमच्या बजेट मधे बसेना. बजेट वाढल तर तर येनार्यांची संख्या कमी होणार होती. त्यामुळ पुन्हा कधीतरी जाऊ अस म्हणुन केरळला बगल दिली. दूसरा पर्याय होता राजस्थान  !!!

राजस्थान  !!!
काय बघणार तिकड ??? काय आहे वाळवंटात ?? असे सल्ले देखिल आले पण नेहमीप्रमाणे विट्टी उडवावी तस उडवून लावले. आनंदाची गोष्ट म्हणजे कुठ हा प्रश्न मिटला. मी खुश होतो म्हणजे प्लानमधे दोन तीन किल्ल्यांचा समावेश होता आणि बरच काही इतिहासासंबंधी बघायला मिळणार होत. राजस्थानात कुठ ?? जोधपुर आणि जैसेलमेर !!! फायनली डन !!!

मेलामेलीत बाराजण असले तरी शेवटी संख्या पाच सहाच असणार हे माहीत होत. रेल्वेच बुकिंग करण गरजेच होत त्यामुळ कोण कोण येणार हे लवकर ठरन गरजेच होत. अंदाजाप्रमाणे जे येणार होते तेच आले. तरी सुट्ट्यांच अजुन मिळतील की नाही  माहीत नव्हत. दोन तीनच  सुट्ट्या लागणार होत्या इतर दिवस सुट्ट्यांचेच होते. आता पुन्हा मेलामेली येणारे To मधे बाकी Cc मधे !!! सहाजण तयार झालो. विनय व्यास ट्रिप मँनजर, नरेश मालविया राजस्थानला जायच म्हणुन जरा जास्तच खुश, सद्दाम शेख कुठपण आणि कधिपन यायला कायम तयार,  अभिजीत मेस्त्री कायम फिरायला पुढ पण हयावेळी हानुनमारून  नाव  लिहलेल  आणि  प्रितम सुतार शेवट पर्यंत हो हो म्हणणार आणि शेवटच्या वेळेत कलटी देणार खुप वेळचा अनुभव. फायनली सहाजणांच तिकीट बुकिंग झाल, नेहमीप्रमाणे वेटिंग लिस्टमधे..... २९ नोव्हेंबर ला मल्हारगडावर असताना विनयचा मँसेज आला ... ticket confirmed ...आणि फोटोपण. जोधपुर एक्सप्रेस .... २९ डिसेंबर २०१४... संध्याकाळी ६ वाजुन ५० मिनटांनी !!!



 पण सगळ सरळ रेषेत झाल तर मग फिरन कसल ??? अभ्याला सुट्टी मिळत नव्हती. वीकेंडला पण काम कराव लागणार होत, इच्छा असुनही त्याला बेत रद्द करावा लागला. अमोल यायला तयार होता तसा उत्साही पण जरा जास्त मोटीव्हेट करावा लागणारा अमोल पठारे. अमोलला तळ्यातुन मळ्यात आणण्याची जबाबदारी सिडभाइनी ( ह्या ट्रिप मधील सद्दामच नाव ...पिक्चरवाला फोटोग्राफर सिड ... आमचे फोटो चांगले काढावेत म्हणुन !! ) अगदी व्यवस्थित पार पाडली. आता सगळ सुरळीत होत. तोपर्यंत आठ दिवस आधी प्रितम बाबांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी बाँम्ब टाकला. गावची यात्रा असल्याने येणार नाही. आमच्या भाषेत नेहमीप्रमाणे टांग मारली. प्रितमने टाकलेला बाँम्ब पद्धतशीरपणे बाकीच्यांनी माझ्यावर फोडला. सहापैकी एक सीट मोकळी प्रवास करणार होती.
पुन्हा नविन व्हाटस् अप ग्रुप .....ढीगान मँसेज.... मेलामेली... आणि 

नियोजनाच्या नावाखाली निव्वळ खेचाखेची !!! सगळ्यांना व्यवस्थित सुट्ट्या मिळाल्या होत्या फक्त सद्दामला आजारी पडाव लागणार होत. सगळी तयारी व्यवस्थित झाली. घरूनपण  परवानगी  मिळाली.  म्हणजे थोडासा हट्ट केला की ती मिळतेच.  
३० तारखेला  ऑफिस करून  ट्रेन पकडायची होती. त्यामुळे विनय साहेबांनी स्टेशनपर्यंत खास कँबची सोय केलेली. एक तास आधीच चौघेजण स्टेशनला पोहचलो. ट्रेन यायच्या आधी दहा मिनिट नरेश पोहचला. 
आणि आवाज आला, "जोधपुर एक्सप्रेस प्लाटफॉर्म क्रमांक तीन पर आ रही है । " हा तीन नंबरच मला आठवतय.... आता सेल्फी तो बनता है .....

डावीकडुन  विनय, सद्दाम, मी, नरेश, अमोल


to बी continue.....

मनाची घोडदौड ..... एक जगलेला दिवस

उजडायला अजुन दोन तासांचा तरी अवधी असल. भल्या पहाटे देवपुजा उरकुन आईसाहेबांच्या हस्ते माथ्यावर चंद्रकोर लाऊन सदरा अडकवला. वर जरीच मुंडास बांधुन स्वारी तयार झाली.पाठीला ढाल अन कमरल तलवार लाऊन पायात कोल्हापुरी सरकवत उंबर्यातुन  बाहेर पडलो.वाड्याच्या दारावर येतो तोच सदान गंगीला तयार करून  पुढ  आणली. जनावर एकदम उमद हीच अगदी पुर्वजन्माच नात. जात घोडीची पण माणसाच मन लाभलेली गंगी घोडी आमच्या पाग्यातल मला सगळ्यात जास्त आवडणारी. समोर येताच खुरान जमीन उकरू  लागली.  कमरची  तलवार सावरत अन मिशिला ताव देत मी घोडिवर मांड  टाकली. घोड्यावर  मांड पक्की तरच तुम्ही जनावरावर  राज्य करु शकाल मी ते शब्द विसरलो नव्हतो. गंगीन लगेच पुढच दोन पाय हवेत उचलुन मला प्रतिसाद दिला आज हिचा पण सुर वेगळाच जाणवत होता.  

धुक्याला कापत आम्ही अंतर कापत होतो. गाव कधीच माग पडल होत. अन आम्ही सिंहगडाच्या वाटेला लागलेलो. अजुन सूर्य नारायणानी दर्शन दिल नव्हत. त्यामुळ गडाच  दरवाज बंदच असणार होत. महाराजांचा तसा आदेशच होता. पायथ्यापासुनच तान्हाजीरावांच्या पराक्रमाला  मनोमन मुजरा करून  पाबे घाटाचा  रस्ता धरला.  ह्याच वाटेन शाहेस्तेखानावर   हल्ला करून महाराज अन मावळ परतल होत. ही वाट बोम्बल्यान मला दाखवलेली. बोम्बल्या म्हंजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यातलाच शिलेदार असावा अस मला कायम वाटत. पाबे घाटाच्या माथ्यावरून तोरण्याच अन राजगडाच  दर्शन झाल. आत्ताशी कुठ पूर्वेला तांबड फुटायला लागल होत. अन आम्ही राजगडाच्या दिशेन घोडदौड करत होतो. सूर्य नारायणाच दर्शन मला बालेकील्ल्यावरन  घ्यायच होत. राजगड कायम मनात पुजला जातो महाराजांनी आयुष्याची बावीस वर्ष हीथ घालवली. मोठ्या मोठ्या मोहिमा हितनच निघाल्या. हीच स्वराज्याची पहिली राजधानी....गरुडाच घरट, राजियांचा गड अन गडांचा राजा.... राजगड !!!
घोडीवरून  पायउतार   होत  राजमार्गान धाव घेत पाली दरवाजा गाठलासुद्धा !! दमछाक करणारा राजगड पण आज मी काही क्षणात वर आलो होतो. पद्मावती मातेचे दर्शन घेउन मोर्चा बालेकिल्ल्याकड वळवला.बालेकिल्ल्याच्या महाद्वाराच्या पायर्यांवर   बसुन सुवेळा माचिवरुन  रंगांची  उधळण  करत वर येणार्या भास्कररावांच दर्शन घेन म्हणजे नशीबच ... ह्याच द्वाराच्या कोपर्यात अफजलखानाच मुंडक पुरलय. आमच्या स्वराज्याकड वाईट नजरेन बघेल त्याची अशीच अवस्था होइल अशीच साक्ष तो दरवाजा देतोय. बालेकिल्ल्यावरून मावळाच दर्शन घेउन पुन्हा पद्मावती माचिवर येतो आणि राजमार्गा कड चालु लागलो. संजीवनी माची राहिली म्हणताय अहो ती आत्ताच नाय ...

खाली येउन आम्ही लगेच निघतो भोरकड... भोर वरंधा महाड अन लगेच रायगड.... धन्याच घर ...आमचा राजा रायगडी राहतो.  भोर ओलंडुन वरांधात घुसलो की पावसाच्या सरी भिजउ   लागतात. कोकणातुन आलेले ढग अगदी अलगत आम्हाला स्वर्गाची झलक  दाखवतात. ढगातुनच घोडिवर बसुन समोरून  आलेल  ढग बाजुला सारत महाडात उतरतो. आता ओढ लागलेली असते महाराजांच्या दर्शनाची. लांबूनच रायगडाच अन् सह्यकड्याच रूप डोळ्यात साठवत ''मनात पूजिन रायगडा'' म्हणत नतमस्तक होतो आणि वळतो  पाचाडाकड. आऊसाहेबांच्या दर्शनाला.राजमाता जिजाऊंसमोर नतमस्तक होतो. आजही पहिला मुजरा पाचाडात घालतो.

शरीरान जेंव्हा खुबलढा बुरुजाजवळ असतो तेंव्हाच मन धापा टाकत नाना दरवाजा ओलांडून महादरवाज्याला थाप मारत असते. वर आभाळालाही लाजवेल अशा डौलात फडकनारा भगवा जरीपटका उर भरून  आणत  असतो. महादरवाजा हिरोजीना मुजरा घालायला भाग पाडतो. रायगड बांधणारे हीरोजी. पुढ जात हत्ती तलाव, गंगासागर तलाव, आकाशाला भिडणारे मनोरे मराठ्यांचे ऐश्वर्य दाखवतात,आजही आम्हाला ते आकाशाला भिडलेले दिसतात. पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, राणीवसा माग टाकत, राजसदरेवर  पोहचतो. नगारखान्यातुनच  वाकुन तीन हाथ मुजरा घालत आत शिरतो अन् गगनभेदी गारद देतो...

"महाराज.....गडपती...गजपती...भूपती..अष्टावधानजागृत...अष्टप्रधानवेष्टित...न्यायालंकारभूषित...शस्त्रास्त्रशासत्रपारंगत...राजश्रियाविराजित..सकळकुळमंडळीत...राजनीतीधुरंधर...प्रौढप्रतापपुरंदर... क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर..महाराजाधिराज....राजा...शिवछत्रपती महाराजांचा विजय असो...''

राजसदरेवरून  होळीच्या  माळाकड निघतो. इथच शंभुराजानी  होळीतुन नारळ काढला असल, अन् महाराजांनी मोठ्या अभिमानान शेरभर सोन्याच कड हातावर चढवल असल... बाजारपेठेतुन पुढ जात जगदीश्वराच्या दर्शनाला निघतो.जगाच्या ईश्वराच दर्शन घेउन पुढ जाउन माझ्या परमेश्वराच दर्शन घेतो. वाघबीळातुन  येणारी गार हवा घेऊन माघारी फिरतो.

रायगडावरून  पाय कधीच  निघत नाही, तरीपण जड पावलांनी रायगड सोडतो. कोकणाची  किनारपट्टी माझ्या ख़ास आवडीची. किनार्यावरून घोडी फेकत पुढ निघतो. मुरडाच्या किनार्यावरून जंजिरा दिसतो. त्याला पाहिल्यावर कधीच काही वाटत नाही त्याची काय ती किंमत ज्याला आमच्या राजांचे कधी चरणस्पर्श झालेच नाहीत.... अभागी रे तु अभागी !!! आलिबाग मधुन आंग्रेंच्या समाधीला वंदन करून  घाट माथ्याकड दौड़ु लागलोय. मधेच राजमाची घनदाट जंगलातून खुणवत होता वाट वाकडी करून  घोडी त्या घनदाट जंगलात दामटवत अनेक दरया-खोरी ओलंडुंन राजमाचीवर पोहचलो. राजमाचीच्या गुहेत थोडा आराम करुन सह्याद्रीच देखन रूप डोळ्यात साठवुन पुढ निघलो. इथुन खंडाळ्याचा घाट परिसर एकदम देखणा दिसतो. राजमाचीच्या पायथ्याच्या प्राचीन मंदिरातल्या महादेवाच दर्शन घेउन राजमाचीचा निरोप घेतला. त्याच पट्ट्यातल्या लोहगड विसापुराकड  निघतो. न विसरता भाजे लेण्यातली कलाकुसर जगतो. पायथ्यापासुन दिसणारी लोहगडाची तटबंदी मोहात पाडते. कितीतरी द्वार ओलंडुन वर पोहचलो. लक्ष्मी कोठीची श्रीमंती जगुन विंचुकाट्याकड पळतो. समोरून  वाहणारे ढग  अंगावर घेत, विसापुर इथूनच डोळ्यात साठवतो. 

सूर्य डोक्यावर आलेला असताना आठवण होते रतनवाडीच्या अमृतेश्वराची.पल्ला लांबचा पण घोडिला आता पंख लागल्यासारखी ती धाऊ लागली होती. जुन्नर नारायनगाव माग टाकुन खुबी फाट्यावरून  रतनवाडीत  पोहचलो पण ! अमृतेश्वराच हेमाडपंथी मंदिर कलाकुसरीचा अनोखा नमुना. लोक म्हणतात की हे मंदीर पांडवानी बांधल पण मला हे मान्य नाही ज्या कलाकारांनी त्यांच आयुष्य ह्यासाठी घालवल त्यांच्यावर  अन्याय करायला मन धजवत नाही. मंदिराच्या परिसरातली पुष्कर्णी कायम लक्षात राहन्यासारखी. माग उभा असलेला रतनगड बोलवत होता. अन मी सहाजिकच तिकड चालु लागलो. उन्ह वाढली होती. रतनगडाच्या  गुहेतुन सह्याद्रीच्या  रांगा न्याहाळुन गणपती कोरलेल्या दरवाज्यातुन किल्ल्यात  प्रवेशलो. समोर दिसत होत सह्याद्रीच अजुन एक रूप.  समोर कात्राबाईचा कडा अन खाली खोलच खोल दरी ढग वरून  कसे दिसतात ते इथ समजत. नेढ्यात बसुन पुढ निघालो. रतनगडाच  हे प्रवेशद्वार म्हणजे तोंडात   बोट घालायला लावणारी जागा. थोडी जरी नजर चुकली की कपाळमोक्षच.  बाणाच्या सुळक्याला  वळसा घालुन खाली उतरलो. 

पोटात कावळ्यांनी थैमान घालायला सुरुवात केली. सह्याद्रीत असताना कुणाचही दार ठोठवा तुम्हाला अगदी जावायासारखा  पाहुनचार  भेटणार कारण सह्याद्री अन स्वराज्य कधीच कुणाला उपाशी ठेवत नाहित. पोटोबा करून  सह्याद्रीच्या चमत्काराच्या दिशेने निघालो संधन दरीच्या दिशेने. संधन म्हणजे गूढ़ अकल्पित आणि कधीही न सुटलेल सह्याद्रीच कोड ! अशा किती जागा सह्याद्रीच्या पोटात लपुन बसल्यात कोणास ठाऊक ??? ह्या जागेच वर्णन करायला शब्द नाहीत. साम्रद मधे आल्यावर अलंग मदन कुलंग हसत आमंत्रन देत असतो. आत्ताच नाही पुन्हा नक्की येईन म्हणुन मी निघालो हरिश्चंद्रगडाकड ! अजुन एक हेमाडपंथी  मंदीर, लहान लहान खुप मंदिर आणि पाण्यातला केदारेश्वर ! छाती एवढ्या पाण्यातून केदारेश्वराला  प्रदक्षिणा घातली. इथला बाप्पा हृदयात  राहतो. हाच खरा देव. साध्या फुलाचीसुद्धा अपेक्षा न करता उन्हापावसात हजार वर्ष अस्तित्व टिकऊन आहे. आता वेळ कोकणकड्याची !! कोकणकड्यावर गेल्यावर गरुडरुपी  मन  आभाळात  घिरट्या  घ्यायला लागत. ह्यापेक्षा सुंदर काही असुच शकत नाही !!

हरिश्चंद्राची कलाकुसर भुलेश्वराची आठवण करून देतो आणि मी भुलेश्वराच्या गाभार्यात पोहचलो सुद्धा !! ह्याइथली कला म्हणजे मानवरूपात  येउन  देवाने  केलेला   दैवी चमत्कार !!
पलीकडच जेजुरीत खंडेराया सह्याद्रीच्या संगतीत राहतो.खंडेरायासमोर माथा टेकुन माथी भंडारा लाऊन सासवडला बगल देऊन  पुरंदरवर पोहचलो. धाकट्या धन्याला मुजरा करून  बालेकील्ल्यावर फेरफटका मारला. भास्करराव आता परतीच्या वाटेला लागलेले. संध्याकाळची वेळ जवळ यायला लागली की आठवण होते संजीवनी माचीची !! गडबडीत बालेकिल्ल्याला बगल देऊन पळत पळत  संजीवनी माचीवर येउन बसलो. ह्या जागेवरून  भास्कररावांना  निरोप देन म्हणजे स्वर्गसुख !!!

कधीच कोणी मधे अडथळा आणु नये कायम इथच बसुन भास्कर रावांन बरोबर बोलत बसाव अस वाटत असतानाच मला मागुन कोणीतरी जोरजोरात हलवत होत मी म्हणत होतो थोडा वेळ अजुन फक्त थोडा वेळ बसु दया ती आकाशाची भगवी किनार मला बघु दया.

पण मागचा आवाज आता खुपच वाढला होता, " अरे उठ ना..  नऊ वाजलेत  रविवार असला म्हणुन काय कोणी एवढा वेळ झोपत का ??? " मी मात्र एकटाच  गालातल्या गालात हसत होतो. किती आळशी तु अस आई म्हणत होती पण तिला कस सांगणार ही स्वारी आत्ताच कुठुन दौड मारून  आली होती. सांगितल असत तरी तीच उत्तर मला माहीत होत , "वेडा आहेस तु" हे ठरलेल..

खरच असेल तस कदाचित कारण आत्ता मी इथ असतो तर लगेच रायगडावर राजदरबारात .... कधी टकमक  टोकावर तर कधी कोकण कड्यावर... कधी जगदीश्वराच्या गाभार्यात तर कधी भुलेश्वराच्या .... कधी हरिश्चंद्रेश्वरासमोर नतमस्तक तर कधी अमृतेश्वरासमोर....कधी रायगडावर   महाराजांनसमोर तर कधी   तुळापुरात वढुत शंभु राजांसमोर... कधी नगारखान्यासमोर  महाराजांच्या  राज्याभिषेकात तलवार नाचवत तर कधी लक्ष्मी रोडवर बाप्पासाठी  ढोल वाजवत ..... असाच आहे मी अगदी आई म्हणते तसाच ...



मोहिम किल्ले पुरंदर

पुरंदर स्वच्छता मोहिम आणि दुर्गभ्रमंती
इतिहास मराठी मातीचा परिवार !!!
दि. १८ जानेवारी २०१५

पहाटे तीन वाजता फोन वाजतोय ....कोण आहे एवढ्या लवकर ??? पहाटे तीन वाजता   ते पण रविवारची पहाट .... फोन उचलला तर पलीकडून किशाचा  प्रश्न झोपलाय का ???? अरे ##@@## ....  आमच्याकड तरी ह्या वेळेला झोपतातच. आम्ही वाकड ला आलोय सहा वाजेपर्यंत पुरंदर पायथ्याला पोहचतोय सांगुन किशान फोन ठेवला. अहो पण हे तर रात्रीच ठरलेल ना. तरी   मुंबईकरांची ही अश्या खोड्या करायची जुनी सवई .  मुंबईकर निक्या किशा रुप्या तिघ पण अवलियेच. कॉलेजला असताना सातारकर म्हणुन झालेली मैत्री आणि आता जिवलग मित्रांच्या यादीमधले ! झोपेच खोबर झालच होत पण ह्याच विशेष वाईट वाटल नाही कारण जवळ जवळ दोन अडीच वर्षानंतर आम्ही सगळे भेटणार होतो. मुंबईकरांसोबत अजुन बम्पर गिफ्ट होती.सचिन दरेकर पु.क.फेम सचिन दरेकर. आणि सोबत होता पूर्ण इतिहास मराठी मातीचा परिवार !!! निमित्त होत पुरंदर स्वच्छता मोहिम आणि दुर्गभ्रमंती !! 

सहालाच कायमची माझी पार्टनर घेउन अंधारातच बाहेर पडलो. रोड लँपच्या उजेडात सोनेरी झालेल धुक कापत मी आणि ती निघालो होतो. (बाईक हो ...अजुन ती वाली ती नाहीयेय !!) दापोडी स्टेशन वरून  मह्याला  ला घ्यायच होत. मी पोहचायच्या आधीच मह्या हजर होता. कॉलेजच्या वेळी एकदा माझी आणि ऋशीची वाट बघत NH4 च्या डिवायडरवर हायवेच्या बरोबर मधोमध उभा राहिलेला आज रस्त्याच्या बाजुला उभा राहिलेला महेश (मह्या) खरच आय टी मधला प्रोफेशनल अभियंता वाटत होता. तिथुन दोघेजण हाय फाय सिमेंटच्या  जंगलात घुसलो. तळ्यात मळ्यात करत ती धावत होती. मागुन मह्याच बोलण चालु होत.आणि ह्या जंगलात आमचा रस्ता चुकला. पाउलवाटा कधी चुकत नाहीत पण हे डांबरी रस्ते हमखास चुकवतात. विचरत विचरत पाबे घाट गाठला. घाटात हौश्यांची गर्दी होतीच.एका बाजुला पूर्ण पुणेआणि  दुसरीकड भास्कररावांच  दर्शन घेत दिवे घाट ओलंडला.

घाटा पलिकडे माउलींच्या विसाव्याजवळ मस्त गरमागरम कांदा भजी खाऊन पुढ निघालो. जाधवगडाकड बघत पुढ निघालो आत्ताच होटेल  जाधवगड. सासवड भागात चकरा वाढल्यात एवढ मात्र खर.सासवडमधे  शिरताच समोर असणारी महाराजांची मूर्ती कायमच मनाला भुरळ पाडते. दिड दोन महिन्यात ही तीसरी चौथी वेळ होती.




सासवड ला वळसा घालुन आम्ही पुरंदरकड धाऊ लागलो. समोर दिसत होता पुरंदर आणि वज्रगड. गडाचे अवाढव्य  रूप  पाहून  डोक्यात शहाजी महाराजांचे  शब्द खेळत होते.

"गडासारखा गड पुरंदर दरडीवरती दरड
 कड्यावरती कडे त्याच्या वरती कपार 
कपारीला धार धारेवरती कोट 
कोटाच्या आतमाची माचीच्या आत बालेकिल्ला
बालेकिल्ल्याला बुरुज चोवीस चोवीस बुरुजात शेंद्र्या बुरुज 
बुरुज भिडला आहे आभाळाला आभाळात भिरभीरतील घारी 
अन् बालेकिल्ल्यात तळपतील तिखट  तलवारी "


बाकी मंडळी पायथ्यापासुन चालत वर गेले होते. आम्ही मात्र गाडीवरच वरपर्यंत गेलो. आणि समोर लागल इंट्री गेट हो इंट्री गेट च पुरंदर आता भारतीय लष्कराच्या  अदिपत्याखाली आहे. मुंबईकर भेटले. गेट वर फॉरमलिटीज त्यांनी आधीच पूर्ण केल्या होत्या.विजिटर डायरीत ४१+२ करून  आम्ही आत घुसलो.

कॉलेजला  असताना रात्र रात्रभर इतिहासावर चर्चा व्हायची आपली पण अस काम करणारी संस्था असावी अस वाटायच पण त्यावेळी ते हवेतच विरून  जायच.  पण  मुंबई करानी   ते काम मात्र पूर्ण केलय. आज इतिहास मराठी मातीचा परिवार विविध क्षेत्रात कार्यरत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन आज पुरंदर वर स्वच्छता मोहिम होती. कॉलेज मधे टिंगल्या उडवनारा निख्या आज प्रत्येक किल्ल्याची पावला पावलाची माहिती ठेवतो. उगच गूगल बाबा म्हणुन नाही ओळखत  त्याला.

पुरंदर ... पुरंदर बद्दल मनात जरा वेगळच  स्थान. स्वराज्याच्या धाकल्या धन्याच, दिल्लीच्या तख्ताला महाराष्ट्रापुढे  लोळण्या   घ्यायला लावनारया  रणधुरंधर छत्रपती संभाजी महाराजांच जन्मस्थान. मुरारबाजींच्या अतुलनीय पराक्रमाचा साक्षीदार पुरंदर. पुरंदराचा  उल्लेख पुराणात इंद्रनील पर्वत म्हणुन आढळतो. इंद्राच स्थान जस बळकट  तसच पुरंदराच. बहामनी, आदिलशाही, मराठा राजवट, मुघलशाही , पेशवाई , ब्रिटिश राजवट आणि आत्ता भारतीय लष्कर असा भल्या मोठ्या इतिहासाचा साक्षीदार.शिवरायांच्या स्वराज्य उभारणीच्या  सुरुवातीच्या काळापासुन ते अगदी इंग्रजांविरुद्ध  लढणार्या उमाजी नाईकांनपर्यंत पुरंदर ने सगळ्याना साथ दिलीय. स्वराज्याच्या सुरवातीच्या काळात ह्याच पुरंदर न मोलाची साथ दिलेली. फत्तेखानचा बंदोबस्त ह्याच्याच आधारान केलेला. १४ मे १६५७ रोजी इथच शंभु राजांचा जन्म झाला.मुरारबाजींनी सईबाई महाराणीसाहेबांच माहेरपण केल.

शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदराला वेढा घातला. या युद्धाचे वर्णन सभासद बखरीमध्ये असे आढळते.
'तेव्हा पूरंधरावरी नामजाद लोकांचा सरदार राजियाचा मुरारबाजी परभू म्हणून होता. त्याजबरोबर हजार माणूस होते. याखेरीज किल्ल्याचे एक हजारे असे दोन हजारे लोक होते. त्यात निवड करून मुरारबाजी याने सातशे माणूस घेऊन ते गडाखाली दिलेरखानावरी आले. दिलेरखान तालेदार जोरावर पठान पाच हजार याखेरीज बैईल वगैरे लोक ऐशी गडास चौतरफा चढत होती. त्यात होऊन सरमिसळ जाहले. मोठे धूरंधर युद्ध जहले. मावळे लोकांनी व खासां मुरारबाजी यानी निदान करून भांडण केले. पाचशे पठाण लष्कर ठार जाहले. तसेच बहिले मारले.'

मुरारबाजी देशपांडेचे हे शौर्य पाहून दिलेरखान बोलिला,
'अरे तू कौल घे. मोठा मर्दाना शिपाई तुज नावाजितो.' ऐसे बोलीता मुरारबाजी बोलिला, 'तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय?' म्हणोनि नीट खानावरी चालिला. खानावरी तलवारीचा वार करावा तो खानने आपले तीन तीर मारून पुरा केला. तो पडला. मग खानाने तोंडात आंगोळी घातली, 'असा शिपाई खुदाने पैदा केला.'



ह्याच मुरारबाजींचा तेजोमय पुतळा आज ही रक्त सळसळवल्याशिवाय  राहत नाही. आजही मुरारबाजींच्या पराक्रमाची ही जागा साक्ष देते. मुरारबाजींसमोर गारद देऊन शिवराय आणि शंभुराजांचा  जयघोष करत आम्ही पुढ निघालो. हल्ली गारद देण्याची संधी मी सोडत नाही आणि आज बरोबर अस्नार्यांची संख्या पण खुप होती. त्यामुळ गड आवाजानी भरून  गेला.  जास्त आवाज करु  नका अशी लष्कराच्या जवानांनी सांगीतल होत पण तस फारस मनावर घेतल नव्हत.  

मूर्ती पासुन समोर गेल्यावर ब्रिटिशकालीन  चर्च बघायल मिळतात. पुरंदरेश्वराच आणि  रामेश्वराच दर्शन घेतल. पुढ असणार्या चौकीवर आमचे सर्वांचे मोबाईल आणि camera जमा केले. सुरक्षिततेच्या कारणासाठी. नो फोटो इच्छा नसताना सगळ जमा कराव लागल काही पर्याय नव्हता.  चेक पोस्ट पासुन डावी कड़ वळुन गडाकड  प्रस्थान केल. समोर लागत प्रवेश द्वार. बुरुज आणि तटबंदी  अजुन तशी चांगल्या अवस्थेत आहे. पण वर वाढत चाललेल  कॉंक्रेटच जंगल चिंताजनक आहे. वाड्यांचे अवशेष बघत पुढे पाण्याच्या टाक्यांना वळसा घालुन आम्ही बालेकिल्ल्यकड निघालो. दोन्ही बाजुला संरक्षक कठडे असणार्या ९२ पायर्या आपल्याला वर घेउन जातात. म्हणजे मी मोजल्या नाहीत वाचेलल कुठतरी . पायर्या थेट आपल्याला केदारेश्वराच्या अंगणात  नेऊन सोडतात. ही पुरंदर वरील सर्वात उंच जागा.मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. 

भास्करराव डोक्यावर आले होते आणि पोटात कावळयांनी थैमान घालायला सुरवात केली होती. हीच ती सह भोजनाची वेळ. शाळा  सोडल्यानंतर फक्त ट्रेक मधेच सहभोजन होत. आजचा बेत तर मोठा होता समविचारांच्या ४२ जनान बरोबर जेवन्याचा योग. अगदी भरपेट जेवण झाल. डबा न नेहतासुद्धा. जेवणानंतर  इतिहासावर चर्चा रंगली अगदी शेंद्र्या बुरुज बांधताना दिलेल्या नरबळीपासुन  ते अगदी उमाजी नाईकांपर्यंत. उमाजी नाईक पुरंदरचे किल्लेदार होते बर का ! ह्याच सह्याद्रीच्या सह्याय्यान  इंग्रजांशी लढा दिला. फितूरी करऊन  सरकारन त्यांना पकडल आणि फाशी दिली. चर्चा बरीच रंगली. 
चर्चेनंतर जोरदार गारद देऊन दुर्गभ्रमंतीचा शेवट केला आणि आता परतीचा प्रवास सोबत किल्ल्याची स्वच्छता. केदारेश्वराच्या  दारातुन आमची मोहिम चालु झाली. बाकी किल्ल्यांच्या तुलनेत कचरा कमी होता पण पाण्याच्या बाटल्या आणि प्लास्टिक पोटापुरत मिळालच. अगदी अडचणीच्या ठिकाणी जाऊनसुद्धा कचरा गोळा करणारे खरच मनाला भावले. फक्त फोटोसाठी किल्ल्यांवर  येणारे वेगळे  आणि कामाची तळमळ असणारे वेगळे. कायम डोक हलवनार्या दारूच्या बाटल्या इथ ही मिळाल्याच. एवढ्या चेकिंग मधे पण ह्या शंढांच्या औलादी हे घेउन वर कशा येतात काय माहीत ? 

जेवढा सापडेल तेवढा कचरा गोळा करत माघारी चेकपोस्ट  जवळ आलो. तिथुन जो सरळ रस्ता पुढ सरळ वज्रगडाकडे जातो. तिथ लष्कराच्या इमारती लागतात. उजव्या हाताला शंभुराजांच जन्मस्थान स्मारक आणि समोर शिवरायांच स्मारक आहे. वज्रगडावर  जाण्यास जवानांनी बंदी केल्यामुळे  तो बेत फसला. शिवरायांच दर्शन घेउन आम्ही शंभुराजांकड वळालो. बाहेर काढलेल्या रांगोळया दोन दिवसापुर्वीच झालेल्या शंभुराज्याभिषेकाची आठवण करून  देत  होत्या. इमारत  तशी  जुनीच झालीय भिंती मजबुत असल्या तरी छत मोडकळीस  आलय. इथला कचरा साफ करून  मूर्तीला जलाभिषेक घालुन वंदना दिली. अष्टगंध   लावलेली ती राजांची मूर्ती अगदी तेजस्वी दिसत होती. 




परतीच्या वाटेवर हातातील पिशव्या बघुन एका जवानाने हटकलच. सगळ ऐकुन घेतल्यानंतर  त्यानी दिलेली प्रतिक्रिया ख़ास नमुद कराविशी वाटतेय, " हाथ में झंडे लेकर शोर करते हुए यहा हर रोज बहुत लोग आते है । लेकिन आप जैसे अच्छे काम करने वाले बहुत कम यहाँ पे आते है । आप अच्छा काम कर रहे हो, इसी तरह से काम जारी रको । सच्चे शिवाजी महाराज बहुत कम लोगो को समजे है । खाली हाँ  में हाँ मिलाने वालो की संख्या दिन ब दिन बढती जा रही है ।"  त्यांच्या ह्या दोन वाक्यांनी आमच्या मेहनतीची पावती दिली होती. त्या परप्रांतीय जवानाच्या तोंडून महाराजांचा आणि शंभु राजांचा इतिहास ऐकुन छाती नक्कीच दोन इंच जास्त फुगली होती.



आता निरोपाची वेळ आलेली, खुप दिवसांनंतर दिवस अगदी हसत खेळत  कॉलेजच्या आठवणी काढत आणि एकमेकांना चिडवत गेलेला. आता मात्र ते ४१ जण मुंबईकड  आणि आम्ही पुण्याकड निघणार होतो. इच्छा नसताना त्यांची बस आणि आमची गंगी चालू झाली. खिडकीतुन  निख्या किशाचा अन सच्याचा दंगा चललाच होता. मी अन मह्या मात्र गपचूप उतरला गाडी लाऊन चाललो होतो. डोक्यात मघाशी जवानानी उठवलेला तो प्रश्न थैमान घालतच होता, '' खरच शिवाजी महाराज आणि शंभु महाराज सगळयांना खरे खरे समजलेत ??? ''


इतिहास मराठी मातीचा परिवार !!!







    -----------------------------------------------------अभिजीत कदम---------------------------------------------------