_

_

Pages

Navigation Menu

कार्ल्याची लेणी आणि किल्ले विसापुर ......

वाढलेल्या उन्हामुळ गेल्या महिनाभरात कुठ जाणच होत नव्हत. अश्या वातावरणात मोठा ट्रेक करायचा तर नाईट ट्रेकच करावा लागणार पण त्यासाठी तेवढा प्रतिसाद पण भेटत नव्हता. फक्त चीड चीड वाढत होती. दोन तीन वीकेंड फक्त सातारा-पुणे-सातारा ह्यातच गेलेले. भटकायचा जाम मुड होता तो जो कीडा असतो तो गप्प बसु देत नव्हता. एक मे च्या सलग सुट्टीसाठी केलेला जंगली जयगडचा बेत पण फिसकटला. ह्यावेळी मात्र कुठतरी जायचच हे ठाम ठरलेल. जवळच कार्ले लेण्या पण हे ठिकाण दोन तास पुरेसे होते पुढच पुढ बघु म्हणुन निघालो.
शुक्रवारी दुपारी ठरल जाऊ उद्या सकाळी सहा साडेसहाला निघायच. मी सोमाटणे  टोलनाक्यावर वाट बघत बसलो. साडेसहा, सात, साडेसात  टोलनाक्याच्या शेजारच्या टेकडीवरच्या  बाप्पाचे फोटोपण काढुन झालेले. आता खरच वैतागलेलो. आठ वाजता प्रितम आणि प्रवीणच आगमन झाल.आणि आम्ही तिघ दोन घोड्यावर निघालो कार्ले लेण्याकडे ....




पुण्यापासुन ६६ किमी वर जुण्या मुंबई पुणे महामार्गावर कार्ले फाट्यावरून  उजवी कड़े  कार्ले लेण्यांकडे रस्ता जातो. डावीकडे वळल्यास  आपण विसापुर लोहगडाकडे जातो. कार्ले फाट्यावर मिसळ खाऊन आम्ही निघालो लेण्यांकडे. मिसळ खातेवेळी  निसर्गातल्या एका सुंदर प्राण्याचे दर्शन झाले.


रंग बदलणारा .....
काय तरी केमिकल लोचा असतो त्यामुळ हा रंग बदलतो.... स्वसंरक्षण अस जाडजुड कारण त्यामाग दिल जात ...विसापुर ला जाताना टिपलेला हा एक....अगदी तीन रंग स्पष्ट दिसतायेत.... पण मला तर वाटत आता ह्याचा नंबर माणसाच्या माग लागतो कारण अगदी स्वत:ला तुमचे बेस्ट बेस्ट म्हणणारे गरजेनुसार अगदी पद्धतशीर रंग बदलतातच की , ते पण केमिकल घोळ न होता.
लेण्यांशेजारीच आई एकवीरेच मंदिर असल्यान गर्दी बर्यापैकी होती. पंधरा वीस मिनिट पायर्या चढून गेल्यावर समोर भव्य लेण्या दिसतात. 
मुळातच लावण्यवती असणार्या एखाद्या सौदर्यवतीला दागिने घालुन सजवावे अगदी तसच काही सह्याद्री आणि त्यात असणार्या लेण्यांच्या बाबतीत. अनेक पाषाण कलाकारांनी आपली आयुष्य खर्ची घालुन ही लेणी तयार केली. कुठही चुक काढायला जागा सापडणार नाही अगदी दोरा घेउन मोजल तरी सगळ तंतोतंत. आजच्या युगालाही लाजवेल असच काही !!!




चैत्यगृहाच्या दाराशीच डाव्या हाताला एक सिंहस्तंभ कोरलेला आहे. भारतात अशोकाने असे स्तंभ उभे केले होते. या मालिकेतील सारनाथच्या धर्तीवर हा इथला सिंहस्तंभ कोरला आहे. हा स्तंभ पंचेचाळीस फूट उंचीचा आहे. त्याची बैठक वर्तुळाकार, आणि अंग सोळा कोनांमध्ये घडवलेले आहे. या स्तंभाच्या अग्रभागी एक वर्तुळाकार कळस दिसून येतो. त्यावर आमलक, हर्मिकेचा चौथरा आहे. या संचावर चार सिंहाची आकृती कोरलेली आहे. 





लेण्या बघुन झाल्यावर एकवीरा मातेच दर्शन घेतल. आत्ताशी फक्त अकरा वाजले होते पण इथ म्हणावी अशी शांतता नव्हती. त्यामुळ इथुन लगेच निघन्याचा निर्णय घेउन आम्ही खाली उतरलो. आता पुढ कुठ हे ठरल नव्हत. मग चलो विसापुर !!!


लोहगड आणि विसापुर ही दुर्गजोडी मळवली रेल्वे स्टेशन पासुन जवळ असल्याने पावसाळ्यात अगदी बागेत फिरायला याव अशी इथ मुंबई आणि पुण्यातल्या चिमण्याकावळ्यांनी गजबजलेली !!! हे किल्ले शांततेत जगायचे असतील तर उन्हाळाच बरा.पावसाळ्यात तीथ चालणारे प्रकार बघवत नाहीत. तस कॉलेजपासुन लोहगडला सहा सात वेळा जाण झाल होत. लोहगडला जाताना दिसणारी विसापुरची तटबंदी कायम आकर्षित करायची आत्ता त्याला मुहुर्त लागला होता.
दोन्ही किल्ल्यांच्या पायथ्यापर्यंत आता डांबरी रस्ता झालाय त्यामुळ हिकडची बिनकामाची पिकनिक स्पॉटवाली गर्दी आता वाढनार हे मात्र नक्की. मळवली स्टेशनपासुन वर घेउन येणारा डांबरी रस्ता भाजे लेणी, विसापुर आणि लोहगडला जोडतो. सपाटीवर  गेल्यावर एकाबाजुला लोहगड आणि दुसर्या बाजुला विसापुर अगदी एकमेकासमोर मांडी घालुन बसालेत अस भासतात. विसापुर म्हणल की आठवतात हरवाहरवी चे किस्से रस्ते न सापडल्याने वाटा चुकलेल्या लोकांच्या गोष्टी.विसापुर ला जाण्यासाठी जिथुन आपण फाटा घेतो तिथ एक छोट खानी हॉटेल आहे. दोन दोन कोकम सरबत पिउन आम्ही विसापुराकडे वळलो. पुढ गेल्यावर एक बंद असलेली टपरी लागेल तिथुन डावीकडे जा मग तिथुन पुढे गेला की दिशादर्शक बोर्ड तुम्हाला दिसतील कोकम सरबतवाल्या मावशीनी माहिती पुरवली. इथुन आत कच्चा रस्ता असल्यान जिथपर्यंत गाड्या जातील तीथपर्यंत गाड्या घेउन जाऊ अस ठरल. हां सगळ्यात सोपा मार्ग असावा कारण इथुन तटबंदी जवळच  दिसते. दुसरा एक मार्ग आहे त्यासाठी भाजे लेण्याजवळुन पायवाटेने जावे लागते. 
आम्ही मात्र हा सोपा मार्ग निवडला होता. मिळालेल्या माहितीनुसार टपरी लागली. पावसाळ्यातल सिजनेबल हॉटेल .. फळ्यांच्या डायनिंग टेबलवर बसुन करवंदासोबत रंगली इतिहासाची चर्चा. विषय लवकर संपणारे नव्हते, त्यामुळ आटपत घेऊन चालायला लागलो. जास्त गोंधळ ह्यामुळ उडतो की ह्या बाजुने नक्की वर जाणारा रस्ताच दिसत नाही. त्यामुळ पहिल्यांदा आम्ही सरळ चालत राहिलो. पण वर बरुजा वर  दिसणार्या भगव्याकडे बघून ही वाट वर जाइल अस वाटत नव्हत म्हणुन थोड चालुन माघार घेतली आणि पुन्हा माघारी जिथुन सुरुवात केलेली तिथे आलो. टपरीपासुन वीस पंचवीस फुटावर पाउलवाट  करवंदांच्या जाळीत जाते. त्या वाटेने आत शिरलो. थोडच चालुन पुढ आल्यावर एकाच वाटेला दोन तीन फाटे फुटल्यान आता रस्ता निवडण अवघड झाल पण बुरजा वरचा भगवा टारगेट  ठेउन उजवीकडे वळालो. थोड चालुन जाताच पुढ पाटी दिसली विसापुरकडे.


झाडी एकदम घनदाट असल्यामुळे में महिन्याच्या असल्या उन्हाळ्यात सुद्धा जमीनीवर उन्ह पडल नव्हत.घनदाट झाडी थंडगार वातावरण आता पडी मारण्याचा मोह आवरण खरच अवघड झाल. " आभाळ पांघरायला  भुई उशाला मग उद्याची फिकिर कशाला ???" तत्वान पडी मारलीच.


खरच ह्या जंगलान मन जिंकलेल. एकदम भारी वाटल हा फिल लोहगडा वर कधी भेटत नाही आणि पावसाळ्यात तर नाहीच नाही. मुंबई पुण्याच्या चिमण्यांचा अन त्यांच्यासोबतच्या कावळ्यांचा सो कोल्ड हिंग्लिश चिवचिवाट पावसाळ्यात अशा ठिकाणी वाढतो आणि मग जीव गुदमरल्यासारखा  होतो. आणि म्हणुनच उन्हाळ्यात हिकड आलो होतो आणि सह्याद्रीन नेहमीप्रमाने  अपेक्षेपेक्षा जास्तच दिल होत.
विसापुरला आता हिथुन पुढे दिशादर्शक बाण होते त्यामुळ पुढचा मार्ग चुकण्याचा संबंध नाही आला. वरती चढून आल्यावर कातळात पाण्याची टाकी लागतात. हिथुन पुढचा जो रस्ता आहे तो ओढ्याच्या पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेला आहे. त्यामुळे ह्या वाटेत मोठ मोठे दगड आहेत. दगडांनी संधनची आठवण करून  दिली.



 चढन खडी असल्यामुळ अगदी नाकासमोर आपण चढाई करत असतो. आतापर्यंत डोक्यावरची सावली पूर्ण गेलेली आणि जबरदस्त उन्ह लागतय दमुन एका मोठ्या दगडावर थांबतो. मागे वळुन बघितल्यावर दिसणार्या दृश्याने सगळा थकवा एका क्षणात हरवून जातो. लोहगड... तुंग... तिकोना... आणि पवनेच पाणीच पाणी !!!
लोहगड विसापुरवरून...



तुटलेल्या तटबंदीतुन किल्ल्यात प्रवेश केला. हीथ आधी दरवाजा असावा अस वाटत होत पण खुप माहिती शोधली पण तसा काही उल्लेख सापडलाच नाही. मोर्चा डावीकडे वळवला त्या बुरुजाकडे ज्या बुरुजावरच्या भगव्याकड बघत वर आलो होतो. गारद देऊन गड भ्रमंतीला सुरुवात केली. 


ऐतिहासिकदृष्टया विसापुरवर कोणत्या मोठ्या नोंदी आढळत नाहीत. पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांकडे गेला. नंतर तो मराठ्यांनी जिंकुन घेतला. पवनामावळात येणारा हा किल्ला लोहगडाच्या जोडीने लोणावळा घाटचे संरक्षणासाठी उभा आहे. लोहगडाच्या तिप्पट असणारा किल्ला तसा दुर्लक्षित म्हणतात पण ते मला पटत नाही कारण १८१८ मधे जेंव्हा इंग्रजांनी हा किल्ला घेतला त्याच्या दुसर्याच दिवशी मराठ्यांनी लोहगड स्वताहुन  खाली करून  दिला  यावरून  विसापुर चे  महत्व समजते. किल्ल्यावर आजही काही वाड्यांचे अवशेष दिसतात. असंख्य पाण्याची टाकी असल्या उन्हाळ्यातसुद्धा जलमय होती. पाणी मात्र पिण्यास योग्य नाही. विसापुरचा सर्वात आकर्षक भाग म्हणजे त्याची तटबंदी पाहताक्षणी प्रेमात पडायला भाग पाडणारी तटबंदी आजही  भक्कम आहे. आजपर्यंत लोहगडावरून  पाहिलेल्या तटांवर फिरताना आज एकदम भारी वाटत होते. गडावरच्या मारुतीरायाच दर्शन घेउन तटावरून किल्ल्याला चक्कर मारून परतीचा  प्रवास चालु केला. एक दिवस इतिहासात जगुन पुन्हा त्याच घिस्यापिट्या एसी आणि पीसी च्या जगात !!!!








0 comments:

पंचविशीत...

सुरुवात खर तर कशी करावी समजत नाहिये ....आभार वैगेरे मानुन कुणाला परक करायच नाहिये.... रात्री लाथाबुक्क्यातुन तुम्ही जे प्रेम दाखवलत ते खर प्रेम होत आणि मी त्याहुनही जास्त प्रेम तुमच्यावर करतो ह्याचा प्रत्यय लवकरच येइल. सकाळी  लवकर उठ्न्याचा संकल्प मोडित काढत दिवसाला सुरुवात  झाली  ती  सगळ्यात प्रिय व्यक्तिच्या फोन ने (आईने केलेला ... उग प्रश्न उत्तर नको ).

दिवसभर पडणारा शुभेच्छांचा पाउस सुखाउन गेला.... सह्याद्रीएवढ्या एवढ्या शुभेच्छा देणारे दादा लोक कायम सह्याद्रीप्रमाणे पाठीशी उभे राहतील अशी अपेक्षा करतो (तशी खात्री आहेच) . केक वरची नाव बघुन बर वाटल कारण पोर खरच मोठी झाली कारण "ती" नाव आता नाही आली..... अंगावरचे कपडे सुद्धा फाडून टाकणारे मित्र ज्याप्रकारे  सभ्य शुभेच्छा देत होते त्यावरून  आपण खरेच मोठ झालोय अस जाणवल (वयान तरी नाहीतर तसे अजुन लहानच आहोत )  सगळ्यात जास्त कॉलेजच्या मित्रांना मिस केल....अजुन तो शेवटच्या वर्षीचा ब' डे लक्षात आहे रे .....भेटा राव  आता खुप दिवस झालेत....

खरतर गेल्या चोवीस वर्षात काय कमवल किंवा गमवल एवढा मोठा हिशोब मांडण्यासारख अस काही केलय अस अजुन तरी वाटत नाहीये आणि पंचविशीत प्रवेश म्हणजे अजुन लहानच आहे की हो !!! फक्त रूपरेषा जरा बदललीय ..... अगदी लहानपणी केकच्या भोवती रांगोळी घालुन साजरा केला जाणारा आणि आत्ता खाण्यापेक्षा तोंडाला जास्त लावला जाणारा केक.  खरतर सगळच बदललय  सकाळपासुन  वाढदिवस वाढदिवस  म्हणून नाचत फिरनारे आपण आत्ता मात्र शुभेच्छांच्या फोनवर सुद्धा अगदी गडबडीत बोलतोय का तर ऑफिसला लेट होतोय.  आत्ता अगदी चकचकी कागदातली चॉकलेट भेटतायेत पण त्यावेळी भेटणार्या  त्या पंचवीस पैशांच्या पारलेच्या किसमी चॉकलेटची चव नाहिये अगदी नाव काढल तरी आत्ता जिभेवर तीच चव रेंगाळतेय.  पण साला मित्र मात्र तसेच आहेत अजुन त्यावेळी मुठभर चॉकलेटचा हट्ट करणारे फक्त आता पार्टी मागतायेत एवढच !!!  

आत्ता मस्त डिजिटल कँमेरे आलेत पण कधीतरी लहानपणीचे  ते रोलच्या कँमेरात  काढलेले फोटो बघितल तर कळत  आपण तेंव्हाच हीरो होतो. नवीन कपडे.... हळदी कुंकवाने भरलेल कपाळ.... रडु नये म्हणुन हाथात एखाद खेळण... जबरदस्तीन खावी लागणारी साखर.... समोर भली मोठ्ठी रांगोळी... समोर केक ..... आणि सगळ्यात महत्वाच तुमच्यासोबत तुम्हाला घेउन बसलेली तुमची सगळ्यात आवडती व्यक्ती.....

आत्ताशी थोडस चाललोय अजुन खुप लांब जायचय.... खुप फिरायचय.... खुप माणस जोडायचियेत  ....खुप शिकायचय .... लिहायचय ..... आजपर्यंत सगळ्यांनी भरभरून दिलय आणि असच देत राहाल .... आणि बर्याच जणांनी वयाच्या पंचविशीत प्रवेश करताना काल जे काही प्रश्न विचारले (वय वाढतय  आणि प्रश्न पण)  त्याच उत्तर  माझ्याकड नाहिये... तस काही असल्यास नक्कीच सांगीन..... सगळ्यांचा मनापासून ऋनी ....

#सन्नाटा_मित्र
#ऐकत_नाय_मित्र_मंडळ 
#सिद्धांत_YZ
#GET_13
#अखंड_धातु_रचना

खुप नाव जी घेत नाहिये ते सगळे .... आणि हो ज्यांनी लांब असल्यामुळ फक्त केकच्या फोटोवर भागवलय त्यांनी लवकर केक पाठउन दया.... आणि दहा दिवसापुर्वीच एक bdy गिफ्ट घेउन ठेवनार्या अभ्याचे लई स्पेशल जाहिर आभार .... गिफ्ट ऑफिशियली लवकरच कळवेन ....

तुमचाच,
अभ्या...



एकच फोटो..... बाकी मलाच मिळाले नाहित...



0 comments:

रंगीला राजस्थान !!! भाग ३ (जोधपुर)

१ जानेवारी आजपासुन खरया फिरण्याची सुरुवात होणार होती. सकाळी लवकरच  म्हणजे साधारण नऊ वाजता आवरून  बाहेर पडलो. पेटपुजेसाठी  धाड घातली जनता स्वीट होम वर .. एक से बढकर एक पदार्थ ... एकाएकाची टेस्ट करत जवळ-जवळ  नाश्त्याबरोबर आम्ही जेवणही उरकून घेतल. तोपर्यंत काल ठरवलेली गाडी आली आणि आमचा जोधपुर दर्शन प्रवास सुरु झाला.
उमेद भवन पँलेसपासुन सुरुवात करून  रात्री सूर्यास्त मेहरानगडवरून  बघायचा  असं  ठरलेल ..

उमेद भवन पँलेस... 
एकोनविसाव्या शतकाच्या सुरुवातीला  पडलेल्या दुष्काळात लोकांना काम मिळावे म्हणून ह्याचे बांधकाम सुरु करण्यात आले होते. उमेद सिंह यांच्या नावाने ही वास्तु बांधण्यात आली. १९२९ साली चालु झालेले बांधकाम १९४३ साली पूर्ण झाले. हेनरी वॉर्न या इंग्रज अभियांत्याने त्याची स्थापत्यकला पूर्ण पणाला लाउन ह्याची उभारणी केलिय. त्याने तयार केलेली स्केचेस आणि ड्राइंग आजही आपणास तिथे बघायला भेटतात. उमेद भवन हे जगातील मोठ्या खाजगी निवासापैकी एक आहे. तब्बल ३४७ खोल्या तिथ आहेत. सध्या उमेद भवन तीन भागात विभागल गेलय एका छोट्या भागात संग्रहालय, दुसर्या भागात
होटेल    आणि तिसर्या भागात राजा उमेद सिंह यांचे वंशज गजसिंह राहतात. इथ असणार जुन्या चार चाकी गाड्यांचा ( vintage car collection ) असलेल संग्रहालय पाहन्यासारख आहे.त्याची भव्यता खालील फोटोमधुन लक्षात येतच....









मंडोर किल्ला 
मंडोर जोधपुरपासुन पूर्वेला ९ किमी. वर असणारी मारवाड राज्याची जुनी राजधानी. नंतरच्या काळात राव जोधा यांनी जोधपुर शहराची स्थापना केली आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव राजधानी नंतर बांधलेल्या मेहरानगड किल्ल्यावर हलवली. आजही आपणास राठोड शासकांच्या समाध्या इथ पहावयास मिळतात. येथे असणारी ऐतिहासिक बाग आजही एकदम व्यवस्थित जतन केलेली आहे. इथ गेल्यावर फक्त माकडांपासुन सावध रहा !!!








जसवंत थडा - राजा जसवंत सिंह द्वितीय (१८३७-१८९५)  यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र राजा सरदार सिंह यांनी ही वास्तु बांधली. राजा जसवंत सिंह ह्यांच्या आधी राजघराण्यातील लोकांचे अंतिमसंस्कार मंडोर मधे होत असत. जसवंतसिंह ह्यांच्या इच्छे नुसार त्यांचा अंतिमसंस्कार देवकुंडच्या किनारी करण्यात आले.लाल दगडाच्या चबुतर्यावर संगमरवरामध्ये ही वास्तु बांधलीय. ह्या समाधिच्या परिसरात अजुन काही राजे आणि रान्यांच्या समाध्या आहेत. कारंज्यांची विविधपुर्ण रचना आणि फूल झाडांमुळे समोरचा बगीचा उठुन दिसतो. आत प्रवेश केल्यावर एक मोठी खोली आहे जी दोन भागात विभागलीय एका भागात राजांची चित्र आणि दुसर्या भागात जसवंतसिंह यांची समाधी आहे. इथुन मेहरानगड अगदी विलोभनीय दिसतो. ही वास्तु आणि मेहरान गड यांना जोडनारया रस्त्यावर जोधा राव यांचा पुर्नाकृती पुतळा आहे.




मेहरानगड किल्ला - जोधपुर शहराची शान असणारा हां किल्ला राव जोधा यांनी बांधला आणि राव जोधा यांच्यानंतर  सुद्धा ह्या किल्ल्याचा विस्तार होत राहिला. सुरुवातीच्या काळात दोन महाद्वार असणारा किल्ल्याला आता आठ महाद्वार आहेत जो राठोड राजघरान्याचा पाचशे वर्षांचा इतिहास सांगतो.मंडोरनंतर हा किल्ला राठोड साम्राज्याचा केंद्रबिंदु  राहिला. किल्ल्याच नाव सुर्यावरून पडलय ते कस तर सूर्य म्हणजे 'मिहिर'(संस्कृत शब्द) , मिहिरला राजस्थानी भाषेत मेहर अस म्हणतात आणि राठोड राज्यकर्ते स्वत:ला सुर्यवंशी मानत म्हणुन मेहरानगड!!!


किल्ल्यात जाताना गाइड घ्याच त्यामुळे भरपूर माहिती भेटते. आणि गाइड जरी नाही घेतला तरी प्रत्येक ठिकाणी माहितीफलक लावलेले आहेत. गाइड नसेल तर तुम्हाला किल्ल्यात हवा तितका वेळ फिरता येत हा एक गाइड न घेण्याचा फायदा होतो. किल्ल्यात वरच्या मजल्यावर जाण्यासाठी इथ आता लिफ्ट बसवली गेलीय.





जयपोल आणि फतेहपोल ही महाद्वार अनुक्रमे जयपुर आणि मुघली सेनेवर मिळवलेल्या विजयाची प्रतिक म्हणून बांधली गेलियेत.वर असणार्या तोफा आजही ताकतिची जाणीव करून  देतात.  इथ असणार संग्रहालय हे भारतातील मोठ्या संग्रहालयापैकी एक आहे. इथ आपणास वेगवेगळी हत्यार, युद्ध पोशाख, पालख्या, पाळणे , जुनी नानी, जुन्या तोफा, वस्त्र,चित्र (पेंटिंग्स) बघायला मिळतात.






इथ असणारे वेगवेगळे महाल पाहन्यासारखे आहेत ज्या मधे झाकी महल, शीश महल, मोती महल, फुल महल यांपैकी काहींची छायाचित्रे खाली जोडत आहे.
झाकी महल




शीश महल




मोती महल




फुल महल




एका दालनात एका जर्मन कलाकारने  काढलेले दुर्गादास राठोड यांचे बोलके चित्र आहे. हेच दुर्गादास छत्रपती संभाजी महाराजांकडे औरंगजेबाविरुद्ध लढन्यासाठी मदत मागायला आले होते राजकुमार अजितसिंह यांना बरोबर घेउन. अजीतसिंह हे जसवंतसिंह पहिले यांचे पुत्र. जे मिर्जाराजांसोबत मराठ्यां विरुद्ध चालुन आले होते आणि मराठा फौजेने त्यांची दानादान उडवली होते ते राजा जसवंत सिंह !!! ही माहिती न विसरता गाइडच्या माहितीत मी सांगुन टाकली.





साधारणत: पाचच्या सुमारास किल्ला पूर्ण फिरून  झाला . ढगाळ वातावराणामुळे  किल्ल्यावरुन सूर्यास्त बघायचा बेत फिसकटला. पण किल्ल्यातुन पुर्ण निळ दिसणार जोधपुर शहर आकर्षक वाटत होत.




किल्ल्यावरून दिसणारा क्लॉक टॉवर 



किल्ल्याच्या पायथ्याला असणार्या  कँफेत मस्त नाश्ता करून  आम्ही मेहरानगडला निरोप दिला. वेळ भरपुर असल्यामुळे गाडीवाल्याला बाय बाय करून  पायी यात्रा चालु केली. रस्ता नेहमीप्रमाणे माहितच नव्हता. GPS आणि विन्या असल्यान हॉटेल शोधण अवघड नव्हत. गल्लीबोळ पार करत दिड दोन तास फिरत फिरत हॉटेलवर पोहचलो.

एवढे राजवाडे पाहिले पण काहीतरी अपुर्ण असल्यासारख वाटत होत. त्यात सगळ असुन काहीतरी नसल्या सारख वाटत होत. शेवटी न राहुन फेसबुक वर स्टेटस पडलाच.... फीलिंग  मिसिंग ..... " थाट राजेशाही पण राजगड रायगडीची आपुलकी नाही" अहो कितीही काहीही झाल तरी आमच इमान फक्त रायगडाच्या मातिशीच !!!

राजस्थानात आलोय तर राजस्थानी दाल-भाटी वर ताव मारलाच पाहिजे. पुन्हा शोधमोहीम चालु ....काल पाल हवेली आणि आज दाल-भाटी साठी स्पेशल एक छोटेखानी हॉटेल.... दाल-भाटी देसी घी में.... त्यानंतर रबडी आणि स्पेशल राजस्थानी कुल्फी .... कुल्फी खात खात हॉटेलपर्यंत पायी वारी...... दिवस सुफल संपन्न !!!!

0 comments:

रंगीला राजस्थान !!! भाग २

अगदी वेळेवर आलेल्या गाडीने सुरवात चांगली झाली. आजुबाजुला असणार पब्लिक चांगल होत ही दूसरी समाधानकारक गोष्ट !!! त्यामुळ बावीस तासाचा प्रवास कधी संपला ते समजलच नाही (घ्या समजुन). रात्री महाराष्ट्रात लागलेल्या डुलक्याने डायरेक्ट गुजरात मधेच पोहचवले. रात्रीत मोदींच गुजरात ओलांडून सकाळी दहाच्या सुमारास राजस्थानात प्रवेश केला. आता मात्र जेवढ्या लांब नजर जाईल तितक्या लांबच दिसत होत. अगदी पृथ्वीवर सोनेरी चादर पसरावी अगदी तसेच !!! बोलण्यासाठी हे ठीक होत पण लांब लांब पर्यंत हिरवळ दिसत नव्हती. हिकडचे डोंगरपण ओबडधोबड , रचना अगदीच विचित्र लांबून फक्त दगडांचा ढीग मांडावा तसे दिसत होते अगदी उघडे बोडके !!

   



एकही स्टेशन अस गेल नाही जिथ विण्यान काही खाऊ घातल नाही. हा प्रवास फक्त खादाड प्रवास होता. माहितीसह आमचा प्रवास चालला होता विन्या त्याच विकिपीडिया नाव सिद्ध करत होता. फोटोसेशन ... बडबड.... धिंगाना (गाण्यांच्या भेंड्या असला पांचटपणा  नाही बर का ! ) करत एकदम मस्त प्रवास चालु होता. खिडकीतुन दोन तीन वेळा मोरांचे दर्शन सुद्धा झाले होते. लांबच लांब वाळवंट ... अधुनमधुन लागणारी रंगीबेरंगी गाव.... रंगबिरंगी राजस्थानी फेटे अन जरिकाम केलेल्या छोटे छोटे आरसे लावलेल्या साड्या असे पारंपरिक वेशभूषा केलेले सगळे अनओळखी चेहरे !!!



मजल दरमजल करत बावीस तासांचा प्रवास करून , जवळजवळ ११०० किलोमीटरच अंतर कापुन आम्ही जोधपुरात प्रवेश केला. राव जोधा यांच्या नावावरून  जोधपुर हे नाव पडल ( जोधा अकबर यांमधील जोधांचा काही संबंध नाही !!!)  भगत की कोठी BGKT जंक्शनवर आम्ही उतरलो. तिथुन जवळच नरेशच्या ओळखीने हॉटेल बघुन ठेवल होत. गाडी करून  सरळ  हॉटेलवर पोहचलो. नरेशच्या मारवाडी भाषेचा पुरेपुर फायदा आम्हाला होत होता. स्टेशन वरून आम्हाला घेउन जाणारी हीच गाडी दुसर्या दिवशीसाठी ठरवुन टाकली. हॉटेल नरेशच्या पाहुन्यातलच असल्यामुळ अगदी घरच्यासारख वाटत होत. फ्रेश होउन लगेच आम्ही भटकायला बाहर पडलो. ३० तारखेला  सकाळी ६.३० ते ४.०० ऑफिस करून  नंतर एवढा  प्रवास पण थकवा नावाला ही जाणवत नव्हता.

३१ डिसेंबर .... संध्याकाळी बाहेर पडलो. टारगेट होत फक्त निवांत भटकायच आणि शेवटी एखाद मस्त हॉटेल बघुन पेटपुजा करून रूमवर  माघारी यायच. ३१ डिसेंबरचे रंग वातावरणात दिसत होते.  बाजारपेठातुन फिरून  आम्ही  घंटाघर (clock tower) जवळ आलो. यावर दिलेल्या लाइट इफ़ेक्टमुळे अंधारात अगदी उठुन दिसत होता.
पोट नावाच्या अवयवात आता हालचाल चालु झालेली कावळे ओरडू लागले होते. मग आमचा मोर्चा वळला हॉटेलकडे !! पाल हवेली हॉटेल... हवेलीत चालु केलल  एक प्रशस्त हॉटेल.एकदम राजेशाही थाटात. एका बाजुला छोटस संग्रहालय आणि टेरेसवर  हॉटेल. तिथुन मागच्या बाजुला दिसणारा मेहरानगढ किल्ला त्यावरची ती विलोभनीय लायटिंग आणि नववर्षाच्या स्वागताला चाललेली फटाक्यांची आतिशबाजी  !!! आणि जेवताना फिरंग्यांची सोबत आणि त्यांच चाललेल त्यांच्या नववर्षाच त्यांच्या  पद्धतीन  स्वागत !!!
तुडुंब जेवण करून  रात्री एक वाजता जोधपुरच्या गल्ली बोळातुन रस्ते हुडकत रूमवर आलो .



Continue .....................................................

0 comments: